अमरावती : हिवाळ्यात अनेकदा चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. परंतु बाहेरील अन्नपदार्थ खायचे म्हटलं तर आरोग्य बिघडण्याची भीती असते. मग घरच्या घरी काय बनवायचं, जे चटपटीत आणि पौष्टीकसुद्धा असेल? असा प्रश्न पडल्यास तुम्ही 'शेंगोळे' बनवू शकता. शेंगोळे हा पदार्थ अतिशय टेस्टी लागतो आणि घरगुती साहित्यांपासून तयार होतो. अमरावती येथील गृहिणी रसिका शेळके यांनी शेंगोळ्यांची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
शेंगोळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
1 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी बेसन पीठ, कांदा-लसूण पेस्ट, जिरं, ओवा, टोमॅटो, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ, तेल, शेंगदाण्याचा कूट, इत्यादी.
शेंगोळे बनवण्याची कृती :
शेंगोळे बनवण्यासाठी सर्वात आधी पीठ तयार करून घ्यायचं. त्यासाठी गव्हाचं पीठ, त्यात तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता, बेसन पीठ (गव्हाच्या पिठाच्या अर्ध घ्यायचं) एकजीव करून त्यात जिरं, ओवा, हळद, लाल तिखट, कांदा-लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ हे सर्व साहित्य घालायचं. सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याचा गोळा तयार करून त्यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळायचं. घट्टसर गोळा तयार करून त्यावर झाकण ठेवायचं. 10 मिनिटं हा गोळा बाजूला ठेवून तोपर्यंत शेंगोळ्यांसाठी रस्सा बनवून घ्यायचा.
रस्सा बनवण्यासाठी सर्वात आधी भांड्यात तेल घ्यायचं. तेल गरम झालं की, त्यात जिरं घालायचं. जिरं तडतडल्यावर त्यात कांदा घालायला. कांदा थोडा लाल होऊ द्यायचा. त्यानंतर त्यात लसूण पेस्ट आणि इतर मसाले घालायचे. मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे. फोडणीला छान रंग आला की त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची. टोमॅटो व्यवस्थित नरम होईपर्यंत शिजू द्यायचं.
आता त्यात शेंगदाण्याचा कुट घालायचा. तो परतवून घेतल्यानंतर 2 मिनिटं शिजवून घ्यायचं. फोडणी तयार झाल्यानंतर रस्सा बनवण्यासाठी त्यात पाणी घालायचं. शेंगोळे शिजण्यासाठी पाणी जास्त लागतं. रश्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी येईपर्यंत शेंगोळे बनवून घ्यायचे.
दुसरीकडे झाकून ठेवलेला पिठाचा गोळा काढून तो नरम करण्यासाठी थोडं तेल घालायचं. मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेंगोळे बनवायचे. रश्याला उकळी आली असेल तर त्यात शेंगोळे घालायचे. मग रस्सा छान शिजू द्यायचा. 15 मिनिटांनंतर शेंगोळे तयार झाले असतील. त्यात कोथिंबीर घालावी. आता शेंगोळे खाण्यासाठी तयार असतील.