मीठ कसं ठरू शकतं धोकादायक?
अती तिथे माती ही म्हण मिठाच्या बाबतीत अगदी खरी ठरते. कारण जास्त प्रमाणात मीठ खाणं हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे जर तुम्हाला सलाड, अंडी, किंवा तत्सम पदार्थावर मीठ टाकून खायची सवय असेल तर ते तुमच्यासाठी धोकादायक आहे. अनेक संशोधनातून असं सिद्ध झालंय की प्रमाणाबाहेर मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो याशिवाय मीठ तयार करताना, किंवा आयोडाईज मिठावर प्रक्रिया करताना वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
advertisement
मिठामुळे कॅन्सर कसा होतो?
जास्त मीठ खाल्ल्याने पोटातील आतड्यांवर परिणाम होतो, ज्यामुळे पोटात सूज आणि जळजळ वाढते. ही जळजळ हेलिकोबॅक्टर पायलोरी जीवाणू जे कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतात अशा जीवाणूंचा संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरते. यामुळे पोटात अंतर्गत जखमा आणि अल्सर होऊ शकतात.जगातले जवळपास दोन तृतीयांश लोक या जीवाणूमुळे होणाऱ्या विविध आजारांनी ग्रस्त आहेत.
हे सुद्धा वाचा : Salt Intake : कोणते मीठ आरोग्यासाठी फायदेशीर? किती प्रमाणात खावं?
जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो हे सिद्ध झालंय. युनाईटेड किंगडम मधल्या 4 लाखांपेक्षा जास्त व्यक्तीवर केलेल्या अभ्यासातून हे सिद्ध झालंय की, ज्यांच्या आहारात मिठाचं प्रमाण जास्त होतं त्यांच्यात गॅस्ट्रिक कॅन्सरची लक्षणं दिसून आली. गॅस्ट्रिक कॅन्सरमध्ये पोटाच्या आत ट्यूमर तयार होतात. याचा परीणाम हा चेहऱ्यावर आणि त्वचेवरही दिसून येतो.
पोटाच्या कर्करोगाची लक्षणं
असं म्हटलं जातं कॅन्सर हा सुरूवातीला कळून येत नाही. कॅन्सर जेव्हा शेवटच्या जीवघेण्या टप्प्यात जातो तेव्हा त्याचे परीणाम दिसून येतात.मात्र जर तुमच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढायला सुरूवात झाली तर थकवा, अचानक वजन कमी होणं, सतत पोटात दुखणं, भूक न लागणे, अन्न गिळण्यात अडचण, थोडसं खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटणं अशी लक्षणं दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅन्सरची तपासणी करून घ्या.