जाणून घेऊयात ऊसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे.
ऊसाच्या रसात कॅलरीज, फायबर्स, अँटिऑक्सिडंट्स याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन अ, ब, ब1, ब2, ब3, ब5, ब6 आणि क, अशी जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. त्यामुळे उन्ह्याच्या त्रासापासून सुटका करून शरीर हायड्रेट ठेवून शरीराला ताकद देण्यासाठी ऊसाचा रस पिणं फायद्याचं ठरतं. नोएडातल्या डाएट मंत्रा क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी न्यूज18 ला सांगितलं की, ऊसाच्या रसात असलेल्या प्रमाणात फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते. याशिवाय अपचन, गॅसेस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे पोट आतून स्वच्छ होऊन आतड्यांचं कार्यही सुधारतं. ऊसाचा रस प्यायल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. त्यामुळे कडवट ढेकर आणि पोटफुगीच्या समस्यांपासून आराम मिळतो.
advertisement
यकृताचं आरोग्य सुधारतं:
ऊसाचा रस यकृतासाठी खूप फायद्याचा आहे. ऊसाच्या रसामुळे यकृत आतून स्वच्छ होऊन यकृताचं कार्य सुधारतं. ऊसामध्ये असलेल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे यकृताची जळजळ होत नाही.
मूत्रपिंडाच्या त्रासावर गुणकारी :
आहारतज्ज्ञांच्या मते, ऊसाचा रस मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. ऊसाच्या रसामुळे मूतखडा म्हणजे किडनीस्टोनचा त्रास कमी व्हायला मदत होते. जर एखाद्या व्यक्तीला किडनीस्टोनचा त्रास असेल तर ते दगड किंवा मूतखडा नैसर्गिकरित्या तोडण्यात ऊसाचा रस फायद्याचा ठरतो. ऊसाचा रसामुळे मूत्रमार्गही स्वच्छ व्हायला मदत होते. त्यामुळे मूत्रपिंडाशी संबंधित अनेक आजारांना दूर ठेवता येतं.
त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याचं :
ऊसाच्या रसात अँटिऑक्सिडंट्सने चांगल्या प्रमाणात आढळून येतात. यामुळे त्वचेला उजाळा मिळून ती हायड्रेट राहायला मदत होते. नियमितपणे ऊसाचा रस प्यायल्याने त्वचेवरील मुरुमं आणि पुरळांचा त्रास कमी होतो. वयोमानाप्रमाणे येणाऱ्या सुरकुत्यानांही रोखता येतं. याशिवाय ऊसाचा रस प्यायल्याने रक्तप्रवाह सुधारायला मदत होते.
'या' व्यक्तींनी टाळावा ऊसाचा रस
तज्ज्ञांच्या मते, ऊसाचा रस आरोग्यासाठी फायदेशीर जरी असला तरीही काही व्यक्तींनी तो पिण्यापूर्वी सावधानता बाळगायला हवी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी ऊसाच्या रसाचं सेवन करावं. ऊसाच्या रसात भरपूर प्रमाणात साखर असते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या रूग्णांनी ऊसाच्या रसापासून 4 हात लांब राहावं. मात्र जर तुमची रक्तातली साखर नियंत्रित असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ऊसाच्या रसाचं सेवन करू शकता. याशिवाय ऊसाच्या कॅलरीज ही भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती डाएटवर आहेत किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा व्यक्तींनी ऊसाचा रस पिणं टाळावं.