आरोग्य किंवा आहारतज्ज्ञांच्या मते, आपण आपल्या आहारात सोपे आणि लहान बदल जरी केले तरी शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. आता सूर्यफुलांच्या बियांचं उदाहरण घ्या ना. दिसायला अगदी छोट्या असलेल्या या बियांचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायी फायदे भरपूर आहेत. सूर्यफुलाच्या बियांना सुपरफूड मानलं जातं कारण त्यात आवश्यक जीवनसत्त्वं, खनिजं आणि चांगले फॅट्स असतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
advertisement
जाणून घेऊयात सूर्यफुलाच्या बियांचे आरोग्यदायी फायदे.
पोषणतज्ञ डॉ. कनिका सचदेव यांच्या मते, सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, तांबं, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजं चांगल्या प्रमाणात आढळतात. या बियांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. व्हिटॅमिन ई मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. त्यामुळे अनेक लहान-मोठ्या गंभीर आजारांपासून आपल्या शरीराचं रक्षण होतं. सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेल्या ‘व्हिटॅमिन ई’मुळे त्वचा निरोगी राहायला मदत होते, त्यामुळे विविध त्वचाविकारांचा धोका टाळता येतो. सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेल्या मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्समुळे रक्तातलं कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवायला मदत करतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारून धमन्यांचं आर्युमान वाढतं आणि हृदयाच्या आरोग्यात वाढ होऊन विविध हृदविकारांचा धोका टळतो. महिला आणि पुरुष दोघांसाठीही सूर्यफुलांच्या बिया खाणं फायद्याचं ठरतं. सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेलं व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटी-इंफ्लेमेटरी एजंट म्हणून काम करतं, ज्यामुळे अंतर्गत जळजळ आणि दाहकता कमी व्हायला मदत होते.
मेंदूच्या आरोग्यासाठी सूर्यफुलाच्या बिया महत्त्वाच्या
मेंदूचं आरोग्य सुधारण्यातही सूर्यफुलाच्या बियांची मदत होते. सूर्यफुलाच्या बियांमुळे मेंदूच्या पेशी आणि न्यूरॉन्सचं ऑक्सिडेटिव्ह तणावापासून होणारं नुकसान टाळलं जातं. या बिया खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण व्हायला मदत होते. सूर्यफुलांच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिडही मोठ्या प्रमाणात आढळतं, ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारायला मदत होते. शरीराची पचनक्रिया सुरळीत ठेवण्यात सूर्यफुलाच्या बिया महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे गॅसेस, अपचन बद्धकोष्ठतेचे आजार असलेल्यांसाठी सूर्यफुलांच्या बियांचं योग्य त्या प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
