जयपूर : आपला भारत देश विविध संस्कृतींनी नटलेला आहे. काही राज्यांना पुरेपूर नैसर्गिक सौंदर्य लाभलंय, काही राज्यांची खाद्यसंस्कृती सर्वोत्तम आहे, तर काही राज्यांमधील वास्तू अगदी डोळे दिपवणाऱ्या आहेत. एकूणच प्रत्येक राज्याला स्वतःचा असा इतिहास आणि वैशिष्ट्य आहे.
राजस्थान राज्यात अनेक शाही महाल आणि मोठमोठे राजवाडे पाहायला मिळतात. एवढंच काय, इथून शाही ट्रेनही धावते. या ट्रेनला म्हणतात 'पॅलेस ऑन व्हील्स'. पाहताच क्षणी कोणालाही प्रवास करावासा वाटेल एवढा देदीप्यमान तिचा थाट आहे. दरवर्षी सप्टेंबर ते एप्रिल या काळात धावणाऱ्या या शाही ट्रेनचा प्रवास यंदा 26 सप्टेंबरपासून सुरू होतोय. राजस्थानच्या सौंदर्याचं दर्शन घडवून आग्रा फिरवणाऱ्या या गाडीवरचं नक्षीकामच पर्यटकांचं लक्ष वेधून घेतं.
advertisement
हेही वाचा : विमान उडवणं साधी गोष्ट नाही, दररोज 'या' समस्यांना सामोरं जातात पायलट
पॅलेस ऑन व्हील्स या पर्यटन ट्रेनचा प्रवास राजस्थानातून नाही, तर राजधानी दिल्लीतून सुरू होतो आणि मग ही ट्रेन राजस्थानात दाखल होते. दिल्ली, जयपूर, सवाई माधोपूर, चित्तौडगड, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, भरतपूर असा प्रवास करून ही ट्रेन आग्र्याला जाते. यंदा हा प्रवास सुरू होण्यापूर्वीच 150 जणांनी बुकिंग केलंय.
विशेष म्हणजे येत्या काळात या ट्रेनमध्ये डेस्टिनेशन वेडिंगची सुविधा आणण्याचा विचार सुरू आहे. ज्यामुळे लोकांना चालत्या ट्रेनमध्ये धुमधडाक्यात लग्न करण्याची संधी मिळेल. मात्र त्यासाठी भाडंही तसंच असेल. मिळालेल्या माहितीनुसार, पॅलेस ऑन व्हील्समध्ये लग्न करण्यासाठी प्रति व्यक्ती 6 लाख रुपये द्यावे लागतील. यात कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 7 दिवसांसाठी ट्रेनचं बुकिंग करता येईल. आतापर्यंत डेस्टिनेशन वेडिंगसाठी बुकिंग सुरू झालेलं नाही.
हेही वाचा : विमानाचं तिकीट आठवड्याच्या 'या' दिवशी सकाळी बुक करायचं, स्वस्तात होतो प्रवास!
दरम्यान, सामान्य दिवशी या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठीही तिकीट दर जास्तच आहे. प्रवास लांबचा असेल तर लाखोंवर हा खर्च जातो. परंतु ट्रेनमध्ये सुविधाही तशाच मिळतात. अगदी चढल्यापासून उतरेपर्यंत राजेशाही थाट अनुभवायला मिळतो. पॅलेस ऑन व्हील्सच्या वेबसाइटवर याबाबत माहिती दिलेली आहे.