नवी दिल्ली : आयुष्यात एकदातरी विमानातून प्रवास करावा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकजण कित्येकदा हे स्वप्न सत्यात जगतात. तर, ट्रेनने दररोज लाखो लोक प्रवास करतात. तुम्हाला माहितीये का, जर ट्रेनचं किंवा विमानाचं तिकीट बुक केलं आणि ऐनवेळी आपला प्रवासाचा प्लॅन फिस्कटला, तर तिकिटाचे पैसे परत मिळतात का? जाणून घेऊया.
ट्रेनच्या जनरल क्लास अर्थात सामान्य श्रेणीचं तिकीट 48 तासांआधी रद्द केलं तर पूर्ण रिफंड अर्थात तिकिटाचे सर्व पैसे परत मिळतात. परंतु 48 तासांपेक्षा कमी वेळेत जर तिकीट रद्द करायचं असेल, तर कॅन्सलेशन चार्जेस भरावे लागतात. ट्रेनच्या स्लीपर क्लासचं तिकीट जर 24 तासांआधी रद्द केलं तर तिकीट दराच्या 50% किंमत रिफंड मिळते, त्यानंतर रिफंडची किंमत कमी होत जाते.
advertisement
ट्रेनच्या एसी क्लासचं तिकीट असेल, तर त्यावर कॅन्सलेशन चार्ज जास्त असतं. 24 तासांआधी तिकीट रद्द केल्यास रिफंड मिळतं, परंतु कॅन्सलेशन चार्ज भरल्यानंतरच. जर तत्काळ तिकीट असेल, तर त्याचं कोणतंही रिफंड मिळत नाही. परंतु ट्रेनच रद्द झाली, तर मात्र सगळे पैसे परत मिळू शकतात. आता विमानाच्या तिकिटाबाबत जाणून घेऊया.
एअरलाइन्सकडून अर्थात विमान कंपनीकडून आपलं तिकीट रद्द केलं गेलं तर आपल्याला रिफंड मिळू शकतं. परंतु जर आपण म्हणजेच प्रवाशांनी स्वतः तिकीट रद्द केलं, तर मात्र वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या नियमावलीनुसार वेगवेगळे चार्जेस घेतले जातात. विमान प्रवासाच्या 24 तास आधी तिकीट रद्द केलं तर अनेक विमान कंपन्या पूर्ण रिफंड देतात. तसंच विमान कंपनीकडून तो प्रवासच रद्द झाला, तर पूर्ण रिफंड मिळतं. दरम्यान, काही विमानांची तिकिटं नॉन रिफंडेबल असतात. ही तिकिटं सुरुवातीलाच काहीशी स्वस्त मिळतात. ती रद्द केल्यास पैसे परत मिळत नाहीत.
महत्त्वाचं म्हणजे ट्रेन असो किंवा विमान, तिकीट कॅन्सलेशनची प्रक्रिया वेळ आणि परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे तिकीट बुक करतानाच कॅन्सलेशन आणि रिफंडच्या सर्व अटी, शर्थी व्यवस्थित वाचून घ्याव्या.