जमशेदपूर : अनेकजणांना प्रवासात उलटी, मळमळ, डोकेदुखी हा त्रास होतो. काहीजणांचा जीव प्रवासादरम्यान घाबराघुबरा होतो. मग काहीजण उपाशीपोटी प्रवास करतात, तर काहीजण पोटभर खाऊन निघतात, परंतु त्रास व्हायचा तो होतोच. यामागे विविध कारणं असू शकतात. डायटिशियन सुष्मिता सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
प्रवासात आरोग्य उत्तम नसेल तर आपण एन्जॉय करत नाहीच, शिवाय आपल्या सहप्रवाशांनाही प्रवासाचा मनसोक्त आनंद घेता येत नाही. काहीजणांना उलटीचा त्रास केवळ बसमध्ये होतो, तर काहीजणांना चारचाकी वाहनात होतो. तर काहीजणांना मात्र कुठल्याही प्रवासात उलटी, मळमळ होतेच.
advertisement
हेही वाचा : पोट साफ न झाल्यास अख्खा दिवस बिघडतो! यावर उपाय तरी काय?
सुष्मिता यांनी सांगितलं की, गाडीची स्थिती, गाडीची गती, प्रवासाचे तास, प्रवासाचा रस्ता आणि आपल्या खाण्या-पिण्याच्या पद्धती, इत्यादींवर प्रवासादरम्यानचं आपलं आरोग्य अवलंबून असतं. अनेकजण उपाशीपोटी प्रवास करतात, ज्यामुळे प्रवासात त्रास होऊ शकतो. प्रवासाला निघण्याआधी केळी, चपाती, ब्रेड, शेव, मका, ओट्स, पपई, भात असे कार्बोहायड्रेट रिच पदार्थ खावे आणि भरपूर पाणी प्यावं. ज्यामुळे पोट भरलेलं आणि शरीर हायड्रेटेड राहतं. एकूणच प्रवास उत्तम होतो.
तसंच प्रवासादरम्यान सोबत आल्याचे बारीक काप ठेवावे. थोड्या तोड्या वेळाने ते चोखावे. शिवाय आंबट-गोड चॉकलेट्स सोबत असतील तर उत्तम. तसंच प्रवासात कधीच मसालेदार पदार्थ खाऊ नये. पुरी, पराठा, चीज, बटर तर अजिबात खाऊ नये. त्यामुळे पोट गच्च होतं आणि उलटीसाठी ते कारणीभूत ठरतं.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.