गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांतील संवाद केवळ कौटुंबिक बैठकांपुरता मर्यादित होता. मातोश्री–शिवतीर्थामधील सौहार्दपूर्ण गाठीभेटींमुळे दोन्ही पक्षांतील नातं उबदार झालं असलं, तरी राजकीय समीकरणांवर कोणतीही औपचारिक चर्चा अद्यापपर्यंत झालेली नव्हती. मात्र आता या संबंधांना राजकीय दिशा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मागील काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी होत असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्येही चांगलीच एकजूट निर्माण झाल्याचे दिसून आले.
advertisement
ठाकरे बंधू-मनसे युतीने समीकरण बदलणार?
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची संभाव्य युती झाल्यास काही महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये मोठे समीकरण बदलू शकते. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवलीमध्ये याचा परिणाम दिसू शकतो.
जागा वाटपांची चर्चा कधीपासून?
शिवसेना ठाकरे गटाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये मंगळवार, १८ नोव्हेंबर पासून जागा वाटपाची चर्चा सुरू होणार आहे. या बैठकीत ठाकरे गट आणि मनसेचे काही मोजकेच पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर जागा वाटपांच्या चर्चा सुरू होतील असा अंदाज बांधला जात होता. त्याआधीच मनसे आणि ठाकरे गटाने आपल्या प्रभागांचा आढावा घेतला होता. आता जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होणार असल्याने ठाकरे गट-मनसेची युती जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील अलीकडील जवळीक आणि संवादामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे. या चर्चांमधून कोणता नवा राजकीय आराखडा तयार होतो आणि दोन्ही पक्ष प्रत्यक्षात किती जागांवर एकत्र येतात, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
