सोलापूर : हल्ली लहान मुलांच्या हातात मोबाईल देण्याचा भयंकर ट्रेंड सुरू आहे. लेकरांना खाऊ घालण्यासाठी, खेळण्यासाठी सर्रास हातात मोबाईल दिले जातात. अशातच एक धक्कादायक आणि पालकांना अंतर्मुख करणारी घटना सोलापूरमध्ये घडली आहे. पालकांनी मोबाईल वापरण्यास न दिल्यामुळे एका १३ वर्षीय मुलाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील पेनुर गावात ही घटना घडली आहे. यशराज धर्मराज डोके असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात याबाबतीत नोंद करण्यात आली आहे. मोहोळ तालुक्यातील पेनुर गावात धर्मराज डोके हे कुटुंब सोबत राहतात. धर्मराज डोके हे शेतकरी आहे. शेती करून उपजीविका करतात.
एक मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्यापूर्वी घरात यशराज डोके याने मला मोबाईल का दिला नाही, वाद घातला. अभ्यास कर, मोबाईल वापरू नको, असं घरच्यांनी त्याला बजावलं. पण, आपल्याला मोबाईल दिला नाही म्हणून रागाच्या भरात तो खोलीत गेला. आपल्याला मोबाईल वापरायला का दिला नाही? म्हणून यशराजने राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास लावून घेतला.
खोलीत गेला आणि परत आलाच नाही!
बराच वेळ झाला यशराज काही बाहेर येईना. त्यामुळे कुटुबीयांना संशय बळावला. त्यांनी घरातल्या सदस्यांनी लोखंडी रॉडच्या मदतीने कडी तोडून खोली प्रवेश केला असता समोर यशराजने गळफास घेतल्याचं आढळून आलं. लगेच त्याला खाली उतरवण्यात आलं.. यशराजला तात्काळ पेनुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणलं असता डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं. यशराजच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
या प्रकरणी आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात माहिती दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल नाळे करीत आहेत. १३ वर्षांच्या मुलाने मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
