स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि इतिहास अभ्यासक शिवा काळे यांच्याशी गाविलगड किल्ल्याच्या इतिहासाविषयी लोकल18 ने चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, गाविलगड इतिहासात अनेक घटना घडल्यात. त्यातील काही घटना अज्ञात आहे. पण, सर्वात शेवटची आणि महत्वाची लढाई म्हणजे 14 आणि 15 डिसेंबर 1803 रोजी झालेली कॅप्टन वेनस्ली हा नागपूरकर भोसलेंवर चालून आला होता. तसेच अडगाव या ठिकाणी घनघोर युद्ध झालं होतं. या युद्धानंतर तिसरे युद्ध हे गाविलगड किल्ल्यावर झालं. अडगाव या ठिकाणी झालेल्या युद्धात गाविलगड किल्ल्याचा किल्लेदार बेनीसिंह यांनी आपले सैनिक आणि शस्त्रसाठा मराठ्यांच्या बाजूने लढण्यासाठी दिला होता.
advertisement
त्यात मराठ्यांचा पराभव झाल्याने बरेच नुकसान झाले होते. त्यामुळे अडगाव येथील युद्धानंतर आता बेनीसिंहकडे इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी मोजके सैनिक आणि मोजका शस्त्रसाठा उरला होता. नागपूरकर भोसल्यांचा खजिना त्यावेळी गाविलगड किल्ल्यावर होता. त्यांनी तो बंगालच्या स्वारीतून लुटून आणला होता. त्यामुळे किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी बेनीसिंहवर होती. अशातच इंग्रजांनी हुक उडवली की, आम्ही नागपूर भोसल्यांवर आक्रमण करणार आहे. खरं तर त्यांना गाविलगडवर चालून जायचे होते. पण, इंग्रजांनी केलेल्या हुकीमुळे नागपूर भोसले नागपूरच्या संरक्षणासाठी तिथेच थांबले.
अशातच कॅप्टन वेनस्लीने आपला हेतू उघडकीस न येऊ देता आपला तळ अचलपूर येथे ठोकला. तसेच दुसरा तळ देवगाव येथे ठोकला. म्हणजेच गाविलगड किल्ल्याच्या पायथ्याशी. त्यांनतर गाविलगडवर चढाई सुरु केली. गाविलगड किल्ला हा खूप भव्य आहे. लढाईत सहज पडणार नाही. हे वेनस्लीला माहीत होते. त्यामुळे त्याने विवरचना आखली. एक तुकडी घेऊन बारलिंगा आणि मोझरी गावातून आक्रमण सुरू केलं. त्यांनतर कॅप्टन केनी आणि यंगला सोबत घेऊन दुसरी तुकडी लवादा गावात होती. अशा दोन बाजूने गाविलगड किल्ला घेरला. दोन्ही बाजूला आक्रमण होईल हे बेनीसिंहला अनपेक्षित होतं. त्यात त्याच्याकडे मोजके सैनिक आणि मोजका शस्त्रासाठा होता, तरीही तो लढला.
पण 14 आणि 15 डिसेंबर हे युद्धाचे शेवटचे दिवस. घनघोर युद्ध झालं. इंग्रजांच्या मारा पुढं बेनीसिंहाची ताकद कमी पडली. 15 डिसेंबरला दिल्ली दरवाजातून इंग्रज आत घुसले. तेव्हा त्या ठिकाणी घनघोर युद्ध झालं त्यात बेनीसिंह मारला गेला. तेव्हाच बेनी सिंहाची पत्नी रूपकुवर हिने त्याठिकाणी जोहर पेटवून आत्मदहन केलं, असा गाविलगडचा इतिहास आहे.
दिनांक 14 डिसेंबर रोजी इंग्रजांविरुद्ध किल्लेदार बेनीसिंह आणि मराठा सैन्य धारातीर्थी पडले. बेनीसिंहाच्या पत्नीसह किल्ल्यावरील स्त्रियांनी स्वधर्म रक्षणार्थ प्रणाहुती देऊन जोहार केला. या स्मृतींना उजाळा देण्याकरिता स्वराज्य सेवा प्रतिष्ठान दरवर्षी गाविलगड शौर्य दिन मोहीम आयोजित करीत असते. या गाविलगड शौर्य मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या मराठा शुरांना वंदन आणि किल्ल्याची स्वच्छता केली जाते. बागलिंगा गावापासून अंदाजे 3 किलोमिटर पदभ्रमण मोहीम केली जाते.
यावर्षी एक अभिनव उपक्रम म्हणून गाविलगडची गौरवगाथा हा वार्षिकांक स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यावर्षी प्रकाशित करीत आहे. या वार्षिक अंकात ऐतिहासिक संदर्भातील अभ्यासकांचे महत्त्वपूर्ण आणि आशयपूर्ण लेख प्रकाशित होतील. गाविलगड किल्ल्याचा इतिहास त्याची बांधणी इतरही बरीच माहिती या लेखांच्या माध्यमातून संकलित केली गेली आहे. वार्षिकांकाचे प्रकाशन दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी गाविलगड किल्ल्यावर होणार आहे.