चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर येथील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथील गार्डनमध्ये शनिवारी रात्रीच्या वेळी काही तरुण जमले होते. याच दरम्यान, अज्ञात आरोपींनी १८ वर्षीय सोनू ऊर्फ लखन सकट वाघमारे (रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) या तरुणावर धारदार चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखनचा काही क्षणातच मृत्यू झाला. या हल्ल्यात अन्य एक तरुणही जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
प्राथमिक तपासात ही घटना जुन्या वादातून आणि परिसरातील वर्चस्वाच्या लढाईतून घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. रात्री आठ वाजता झालेल्या या हत्येच्या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकांना रवाना केले आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे चंदननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
