मुंबई : सध्या लोक दिवाळीच्या उत्साहात असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या संभाव्य चक्रीवादळामुळे किनारी भागांमध्ये जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि उंच लाटांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हवामान विभागाने अंदमान-निकोबार बेटांसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी करत नागरिक आणि मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाच्या मते, २१ ऑक्टोबरपासून बंगालच्या उपसागरातील ही हवामान प्रणाली तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत ती चक्रीवादळाच्या रूपात विकसित होऊ शकते. यामुळे २३ ऑक्टोबरपर्यंत अंदमान-निकोबार द्वीपसमूहात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
IMD च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “निकोबार बेटांमधील काही ठिकाणी ७ ते ११ सेंटीमीटर इतका पाऊस पडू शकतो. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. काही ठिकाणी हा वेग ५० किमी प्रति तासांहून अधिक होण्याची शक्यता आहे.” तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी द्वीपसमूहातील काही भागांमध्ये जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. तर २२ ते २३ ऑक्टोबरदरम्यान अंदमान समुद्रात ३५ ते ४५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि समुद्रात उंच लाटा उठतील.
समुद्रात न जाण्याचा इशारा
हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी समुद्राची परिस्थिती “धोकादायक” अशी घोषित केली आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त सल्ला देण्यात आला आहे. आधीच अंदमान समुद्र आणि किनारी भागातील सर्व मासेमारी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे या प्रणालीला ऊर्जा मिळत आहे. त्यामुळे पुढील २४ ते ४८ तास हे निर्णायक ठरणार असून, चक्रीवादळाचा वेग आणि दिशा यावर पुढील अंदाज अवलंबून राहतील.