अलिबाग नगरपालिकेवरील शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला पुन्हा एकदा अबाधित राहिला. नाईक कुटुंबाची अलिबागवरील राजकीय पकड पुन्हा एकदा दिसून आली. शेतकरी कामगार पक्षाच्या अक्षया नाईक यांनी भाजपच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह अलिबाग नगरपालिकेवर गेल्या चार दशकांपासून कायम असलेले शेकापचे वर्चस्व आणखी भक्कम झाले आहे. अक्षया नाईक या नाईक कुटुंबातील सातव्या नगराध्यक्ष ठरणार आहेत.
advertisement
लेक नगराध्यक्ष , बाप नगरसेवक....
अलिबाग नगरपालिकेच्या २० प्रभागांसह नगराध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली होती. यापूर्वीच माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे आता अलिबागच्या नगर परिषदेत लेक नगराध्यक्ष आणि वडील नगरसेवक असे चित्र दिसणार आहे. उर्वरित १९ प्रभागांसाठी आणि नगराध्यक्षपदासाठी २ तारखेला मतदान झाले. दोन प्रभागांचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी दुरंगी लढत पाहायला मिळाली.
शेकाप-काँग्रेस एकत्र...
या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे पारंपरिक विरोधी पक्ष एकत्र आले, तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युती करून शेकाप–काँग्रेस आघाडीला आव्हान दिलं. त्यामुळे ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीची ठरली होती.
शेकापच्या अक्षया नाईक यांना ८,९७४ मते, तर तनुजा पेरेकर यांना २,३३४ मते मिळाली. अक्षया नाईक यांनी ६,६४० मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत शेकापचा किल्ला अभेद्य असल्याचं पुन्हा सिद्ध केलं.
भाजपची खेळी फसली, महेंद्र दळवींनीही अंतर राखलं!
निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटातून तनुजा पेरेकर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी देण्याची भाजपची खेळी फसली, असा राजकीय विश्लेषकांचा सूर आहे. पेरेकर मतदारांवर प्रभाव टाकण्यात अपयशी ठरल्या. याशिवाय, शिंदे गटाच्या आमदार महेंद्र दळवी यांनी शेकापचे नेते प्रशांत नाईक यांच्याशी निकटचा संबंध आहे. त्यामुळे प्रचारापासून त्यांनी अंतर राखल्याचं बोललं जात असून, त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसल्याचं म्हटले जात आहे.
