३० मार्चपासून अवकाळी पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस, मेघगर्जना आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पुढील चार दिवस विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुठे कसा राहणार परिणाम?
३० मार्च रोजी खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे, पाऊस आणि ठिकठिकाणी गारपीटीचा अंदाज आहे. उर्वरित विदर्भातही वातावरण ढगाळ राहून हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. ३१ मार्च रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी वातावरण पूर्णपणे स्थिर राहणार नाही. काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
advertisement
मात्र, १ ते ४ एप्रिलदरम्यान पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज असून, या काळात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीटीचा धोका अधिक राहू शकतो.
शेती पिकांसाठी वाढता धोका
सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यास काढणी केलेल्या तसेच शेतात उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि कांदा यांसारख्या पिकांना फटका बसू शकतो.
विजेपासून सावधगिरी आवश्यक
मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होत असताना शेतात किंवा उघड्यावर थांबणे टाळावे. झाडाखाली, टिनशेडखाली तसेच वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहू नये. पाळीव जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.
पुढील चार दिवस सतर्कता गरजेची
हवामानातील बदल लक्षात घेता पुढील काही दिवस शेतीची कामे नियोजनपूर्वक करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. वेळेवर घेतलेली खबरदारी मोठे नुकसान टाळण्यास मदत करू शकते.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
काढणी केलेले पीक मोकळ्या जागेत न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवावे.
पिकांवर ताडपत्री किंवा प्लास्टिकचे आच्छादन करावे.
शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवावा.
