चंद्रपूर : महाराष्ट्रात प्रशासकीय सुधारणा करण्याच्या दिशेने मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारकडे 20 नवीन जिल्हे आणि 81 नवीन तालुके निर्मितीचा प्रस्ताव आला आहे. हा निर्णय घेण्यासाठी जनगणना, सीमांकन आणि भौगोलिक स्थितीचा सखोल विचार केला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
advertisement
जनतेच्या सोयीसाठी निर्णय
मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, "जिथे खरी गरज आहे, तिथेच जिल्हा आणि तालुके निर्माण केले जातील. लोकांना सरकारी सेवा सहज मिळावी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढावी, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे." नव्या जिल्ह्यांची निर्मिती झाल्यास अनेक भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी होणारा प्रवासाचा त्रास कमी होईल, तसेच स्थानिक विकासालाही गती मिळेल.
शेतरस्त्यांचे मॅपिंग
शासनाकडून सुरू असलेल्या उपक्रमांबाबत माहिती देताना महसूलमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचे मॅपिंग करून त्यांना क्रमांक देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. अतिक्रमण रोखण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार असून, यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यास अडचण येणार नाही. "महाराष्ट्र हे असे मॅपिंग करणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे," असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान
बावनकुळे यांनी जाहीर केले की, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आणि सेवा पंधरवडा राबविण्यास सुरवात झाली आहे. या अभियानातून महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे निवारण, सेवा सुविधा आणि नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या अभियानाची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातून झाली आहे.
आदिवासी जमीन कायदा
यावेळी आदिवासी समाजाशी निगडित महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात नवीन कायदा करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या माध्यमातून आदिवासींना त्यांच्या जमिनींचा अधिक चांगला उपयोग करता येईल आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.असंही बावनकुळे म्हणाले