मुंबई : आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विविध पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने शेवटच्या टप्प्यात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्याने नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. युतीबाबतची चर्चा उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.
advertisement
एकनाथ शिंदे अजित पवार एकत्र लढणार?
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री नरहरी झिरवाळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली आहे. या बैठकीत महापालिका निवडणुकीतील जागावाटप, उमेदवारांची निवड आणि एकत्र लढण्याच्या रणनीतीवर विचारविनिमय झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेना–राष्ट्रवादी युतीची अधिकृत घोषणा लवकरच, कदाचित आजच होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
भाजपचा स्वबळाचा नारा
भाजपकडून नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. “100 प्लस” जागांचा नारा देत भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाकडून उमेदवारांची यादी अंतिम करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, कोणत्याही युतीशिवाय निवडणूक लढवण्याची भूमिका भाजपने स्पष्ट केल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात इतर पक्ष एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे मोठी रस्सीखेच
नाशिक महापालिका निवडणूक यंदा केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित राहिलेली नाही. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर विकासकामांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिकेवर सत्ता कोणाची असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हीच बाब सर्व पक्षांना अधिक आक्रमक बनवत असल्याचे चित्र आहे.
सध्याच्या राजकीय हालचाली पाहता नाशिकमध्ये बहुपक्षीय आणि अत्यंत चुरशीची लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजप, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गटाची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस यांच्यातील संभाव्य आघाड्या आणि युतींमुळे चित्र अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
