नाशिक : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरण तापू लागले असून, या प्रचारात एक ऐतिहासिक घडामोड घडणार आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ९ जानेवारी रोजी नाशिकमध्ये संयुक्त जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेली ही सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार असून, तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
advertisement
9 तारखेला सभा
मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये दोन्ही नेत्यांच्या संयुक्त सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, ३ ते १३ जानेवारी या कालावधीत या सभा पार पडणार आहेत. या दौऱ्यात नाशिकसाठी ९ जानेवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या कार्यालयामार्फत महानगरपालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाकडे अधिकृतरीत्या मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठाकरे बंधूंची पहिलीच संयुक्त जाहीर सभा
नाशिकमध्ये होणारी ही सभा ठाकरे बंधूंची पहिलीच संयुक्त जाहीर सभा ठरणार आहे. शिवसेना आणि मनसेच्या विभाजनानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतंत्र पक्षांचे सर्वोच्च नेते म्हणून प्रथमच नाशिकच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, या सभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या सभेतून ठाकरे बंधू कोणता राजकीय संदेश देतात, याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
अमित ठाकरे, आदित्य ठाकरे सहभागी होणार
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात युवा नेतेही सक्रिय होणार असून, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे नाशिकमध्ये संयुक्तपणे प्रचारात उतरणार आहेत. मुंबईप्रमाणेच नाशिकमध्येही दोघांचा संयुक्त रोड शो आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही युवा नेते एकत्र रस्त्यावर उतरून मतदारांशी संवाद साधणार असल्याने नाशिकच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे अनेक विद्यमान व माजी नगरसेवक अलीकडच्या काळात पक्ष सोडून इतर पक्षांत गेल्याने पक्षासमोर मोठी संघटनात्मक आव्हाने उभी राहिली आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्यासाठी आणि मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी ठाकरे बंधूंची संयुक्त सभा महत्त्वाची मानली जात आहे.
