तक्रारीनुसार, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील एका प्राध्यापकाचा वेतन निश्चितीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संजय जगताप यांनी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एसीबीने सापळा रचला होता. मात्र, कारवाईदरम्यान संशय आल्याने जगताप यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सापळा यशस्वी होऊ शकला नाही. प्रकरण पुढे आल्यानंतर जगताप यांनी वैद्यकीय रजा घेत कार्यालयातून अनुपस्थिती दर्शवली.
advertisement
शिवाय, अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केल्याची माहिती समोर आली. दरम्यान, संबंधित प्राध्यापकानेही तक्रार पुढे नेण्याबाबत अनिच्छा दर्शवली. मात्र, लाचेची मागणी स्पष्टपणे समोर आल्याने एसीबीने स्वतः पुढाकार घेत वेदांतनगर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. बीड येथील एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे. त्यानुसार, संजय जगताप यांनी स्वतःसाठी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी लाच मागितल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वेतन निश्चितीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रति प्रस्ताव 15 ते 20 हजार रुपये घेतल्याशिवाय काम होत नसल्याची तक्रार प्राध्यापकाने केली होती. या प्राध्यापकासह आणखी तिघांचे वेतन निश्चिती प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एकूण 45 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर तडजोडीनंतर 30 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. लाच मागणीच्या पडताळणीदरम्यान जगताप यांना संशय आल्याने त्यांनी पैसे स्वीकारले नाहीत व तेथून निघून गेले. त्यानंतर पुन्हा सापळा रचण्यात आला, मात्र त्यातही ते अडकले नाहीत.
पुढील काळात त्यांनी संबंधित प्राध्यापकासह तिघांचे काम कोणतीही रक्कम न घेता पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय रजा टाकून स्वतःला अनुपस्थित ठेवले. सध्या त्यांचा मोबाइल बंद येत असल्याची माहिती असून, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर एसीबीने स्वतःहून वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी संजय जगताप यांच्याविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविणा यादव करीत आहेत. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
