नाशिक : महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अगदी पूर्वसंध्येला शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रचार थांबल्यानंतरही विविध भागांतून आरोप-प्रत्यारोप, वादविवाद आणि तणावपूर्ण घटना समोर आल्या. काही ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये थेट संघर्ष झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात अस्थिरता निर्माण झाली आहे.
advertisement
शहरातील पंचवटी परिसरात घडलेल्या एका घटनेमुळे विशेष लक्ष वेधले गेले आहे. भारतीय जनता पक्षातून निलंबित तसेच शिवसेनेचे उमेदवार असलेले माजी नगरसेवक कमलेश बोडके यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या एक दिवस आधीच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, बोडके यांच्या समर्थकांमध्येही अस्वस्थता पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणात बांधकाम कंत्राटदार मनोज भागीरथ मुंडावरे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या बाजूने प्रचार केल्याचा राग धरून कमलेश बोडके आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला धमकावले. इतकेच नव्हे तर मारहाण आणि अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी तक्रारीत केला आहे.
तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी कमलेश बोडके हे आपल्या काही सहकाऱ्यांसह थेट मुंडावरे यांच्या घरी गेले. यावेळी त्यांच्या सोबत निलेश घुगे, वृषभ दिघे, मयूर बोडके आणि नितीन शेळके हेही उपस्थित होते. घरात प्रवेश केल्यानंतर ‘आमच्या विरोधात प्रचार का करतोस?’ असा जाब विचारत त्यांनी धक्काबुक्की केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
याच तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, त्यानंतर मुंडावरे यांना जबरदस्तीने घराबाहेर काढून एका सिल्वर रंगाच्या कारमध्ये मधल्या सीटवर बसवण्यात आले. या घटनेला अपहरणाचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला आहे. कारमध्ये बसवल्यानंतर ‘तुला चार दिवस गायब करून टाकू’, ‘आमच्या नादाला लागू नकोस’, ‘तुला सहा महिने फिरू देणार नाही’ अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोप आहे. कॉलर पकडून शिवीगाळ करत कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने गायब करण्याची भाषा वापरण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, बुधवारी जाहीर प्रचार बंद असल्याने अनेक उमेदवारांनी अप्रत्यक्षपणे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केल्याचे चित्र दिसून आले. याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत वादविवादाच्या घटना घडल्या. काही ठिकाणी समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली, तर काही ठिकाणी थेट धमकावण्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला कमकुवत करण्यासाठी दबावतंत्राचा वापर होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी शिवसेनेचे उमेदवार आणि माजी नगरसेवक कमलेश बोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने हा प्रकार राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
