महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन, मास्टर क्लास, विशेष व्याख्याने, चित्रपटांवर चर्चा सत्रे, संवाद कार्यक्रम आणि कार्यशाळा यांचा समावेश असणार आहे. हा संपूर्ण महोत्सव आयनॉक्स, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर येथे होणार आहे.
advertisement
फिल्म फेस्टिव्हलला मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, ऑस्कर पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ध्वनी संयोजक रसल पुकेटी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर रात्री 9 वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे जागतिक पातळीवर गाजलेला आणि ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत असलेला स्पॅनिश/ फ्रेंच भाषेतील चित्रपट ‘ऑलिव्हर लक्स’ प्रदर्शित करण्यात येणार आहे.
महोत्सवाचे उद्दिष्ट
या फिल्म फेस्टिव्हल मागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे जागतिक दर्जाचे चित्रपट मराठवाड्याच्या रसिकांपर्यंत पोहोचवणे, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार आणि युवा पिढीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, शिवाय मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर यांना चित्रपट निर्मितीचे सांस्कृतिक केंद्र आणि जागतिक पातळीवरील फिल्म डेस्टिनेशन म्हणून ओळख मिळवून देणे.
भारतीय सिनेमा स्पर्धा
फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय सिनेमा स्पर्धा विभागाचा समावेश असून, विविध भारतीय भाषांतील नवे आणि दर्जेदार चित्रपट यात दाखवले जाणार आहेत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाला ‘सुवर्ण कैलास’ पुरस्कार आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय दिग्दर्शन, अभिनय, पटकथा अशा विविध विभागांतील वैयक्तिक पारितोषिकांचाही समावेश आहे.
ज्युरी समिती
भारतीय सिनेमा स्पर्धा गटाच्या ज्युरी समितीचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ध्वनी संयोजक आणि ऑस्कर पुरस्कार विजेते रसल पुकेटी (कोरिया) असणार आहेत. ज्युरी सदस्य म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक अनिरुद्ध राय चौधरी (कोलकाता), ज्येष्ठ संकलक आरती बजाज (मुंबई), छायाचित्रकार राफे महमूद (मुंबई) आणि ज्येष्ठ पटकथालेखक अर्मी जुबेकर (मुंबई) काम पाहणार आहेत.
मास्टर क्लास व विशेष संवाद
महोत्सवाच्या कालावधीत नामवंत दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत मास्टर क्लास आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा बदलता चेहरा, चित्रपट- संगीत, दिग्दर्शन, संकलन, ध्वनी संयोजन अशा विविध विषयांवर सखोल चर्चा होणार आहेत.
मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा
महोत्सवाच्या निमित्ताने मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून मोठा प्रतिसाद मिळाला असून, अंतिम फेरीसाठी निवडलेले पाच शॉर्ट फिल्म्स महोत्सवात दाखवले जाणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या शॉर्ट फिल्मला 25 हजार रुपयांचे पारितोषिक व गौरव करण्यात येणार आहे.
चित्रपट समजून घेण्याची कार्यशाळा
विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट समजून घेण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील 25 महाविद्यालयांतील विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होणार असून, ही कार्यशाळा 13 ते 17 जानेवारी 2026 दरम्यान चित्रपट समीक्षकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
प्रतिनिधी नोंदणी
महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू असून, देश-विदेशातील चित्रपट रसिक, समीक्षक, अभ्यासक यांच्यासाठी ही नोंदणी खुली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. प्रतिनिधी नोंदणी www.aifilmfest.in या संकेतस्थळावर ऑनलाइन तसेच आयनॉक्स प्रोझोन मॉल, विशाल ऑटोमॉल (उस्मानपुरा) आणि नाथ हाऊस, पैठण रोड येथे प्रत्यक्ष करता येणार आहे.
समारोप सोहळा
महोत्सवाचा समारोप सोहळा रविवार, 1 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे होणार आहे. या वेळी सुवर्ण कैलास पुरस्कार वितरणानंतर ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतील महत्त्वाचा चित्रपट ‘द वर्ल्ड अंडर अनसर्टन’ (फ्रान्स) प्रदर्शित करण्यात येणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in किंवा info@aifilmfest.in येथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
