शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षावर सध्या कडाडून हल्ले करीत आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावरही ठाकरी तोफ डागत आहे. पण दुसऱ्या बाजूला राज्य सरकारमध्येही या ना त्या कारणावरून सुंदोपसुंदी सुरू आहे. मित्रपक्षांमध्येच शह काटशहांचे राजकारण सुरू आहे. अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मंत्र्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचे नियोजन अप्रत्यक्षपणे भाजपने लावले होते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांना योग्य मेसेज देण्यासाठी देवेंद्र फडणवीस अधून मधून ठाकरेंना चुचकारीत असतात, असेही बोलले जाते. त्यातूनच मिश्किल अंदाजात का होईना पण ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न फडणवीस करतात.
advertisement
अधिवेशनाची सांगता झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी उभय नेत्यांची भेट?
देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय युतीच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांची मुंबईतल्या सोफिटेल हॉटेलमध्ये भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. उभय नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या कारणांवरून भेट झाली, याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. मात्र अधिवेशनाची सांगता झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी उभय नेत्यांची भेट झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
तुम्हाला इकडे येण्याची संधी आहे, देवेंद्र फडणवीस यांची ठाकरेंना ऑफर
आम्हाला २०२९ पर्यंत विरोधी पक्षात जाण्याची कोणतीही संधी नाही.मात्र, तुम्हाला इकडे येण्याची नक्कीच संधी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहातच ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात अँन्टी चेंबरला जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचेही आमदारही होते.