वांद्रे येथील मातोश्री परिसरात एक अज्ञात ड्रोन घिरट्या घालताना आढळला. या परिसरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन किंवा हवाई साधन उडवण्यास कायद्याने बंदी आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रोन उडवण्यास मनाई आहे. अशातच आता मातोश्रीवर ड्रोनने नजर ठेवल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली.
> मुंबई पोलिसांनी काय सांगितले?
मातोश्री निवासस्थान परिसरात ड्रोनच्या घिरट्या दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले. हे ड्रोन एमएमआरडीएचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एमएमआरडीएने परवानगी घेतली होती. खेरवाडी, वांद्रे-कुर्ला संकुलातील परिसरातील सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन ड्रोन यासाठी उडवण्यात आले होते.
advertisement
> आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला सवाल...
शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई पोलिसांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी पाच प्रश्न उपस्थित करत सर्वेक्षणाच्या दाव्यावर सवाल उपस्थित केले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, आज निवासस्थानाच्या आवारात ड्रोन उडत असल्याचे आढळून आले. त्यानंतर माध्यमांमध्ये एमएमआरडीएचे सर्वेक्षण असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, काही प्रश्न उपस्थित होत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
> आदित्य ठाकरेंचे प्रश्न काय?
- कोणत्या सर्वेक्षणामुळे तुम्हाला घरांमध्ये डोकावण्याची आणि तुम्हाला पाहताच लगेच दुसरीकडे वळता, कोणता सर्वे अशा प्रकारे होतो.
- या सर्वेक्षणाबाबत रहिवाशांना का कळवले गेले नाही?
- एमएमआरडीए फक्त संपूर्ण बीकेसीसाठी आमच्या घराची देखरेख करत आहे का?
- एमएमआरडीएने जमिनीवर उतरून त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे, उदाहरणार्थ एमटीएचएल (अटल सेतू) हे भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे.
- जर पोलिसांनी परवानगी दिली असेल तर रहिवाशांना का कळवले गेले नाही? असा सवाल आदित्य यांनी केला.
