नेमकी घटना काय?
तक्रारदार अभिजित दिवाकरराव तायडे (वय ४०) यांनी याप्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. अभिजित तायडे हे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे सख्खे बंधू आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी शुभम उर्फ गोलू माहोरे यांनी मिळून अभिजित तायडे यांच्या हत्येचा कट आखला होता. घातपात घडवून हा एक अपघात आहे, असा बनाव करून त्यांना संपवण्याचा हा प्रयत्न होता, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
advertisement
ऑडिओ रेकॉर्डिंगने उडाली खळबळ
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे एक मोबाईल रेकॉर्डिंग. अभिजित तायडे यांनी पोलिसांना या कथित कटाबाबतच्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग एका पेनड्राईव्हमध्ये देऊन सुपूर्द केली आहे. या रेकॉर्डिंगमध्ये खुनाचा कट कसा अमलात आणायचा, याबाबतचे संभाषण असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी हा पेनड्राईव्ह जप्त केला असून पुढील तपासासाठी तो फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आला आहे.
गुन्ह्याचे स्वरूप आणि कलमे
चांदूर बाजार पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बच्चू कडू आणि गोलू माहोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ५५, ५८, आणि ६१ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू आणि तायडे कुटुंब यांच्यात मोठा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आमदार प्रवीण तायडे यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा उल्लेखही या तक्रारीत करण्यात आला आहे. राजकीय वैमनस्यातून हा कट रचला गेला की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
