काय म्हणाल्या अदिती तटकरे?
अदिती तटकरे यांनी या प्रकरणावर भाष्य करताना दिलगिरी व्यक्त केली. "स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांकडून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. एका ग्रामपंचायत स्तरावरील कार्यक्रमात चुकून अजितदादा आणि सुनेत्राकाकी यांचा फोटो राहिला नसावा. याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते," असे त्या म्हणाल्या.
निष्ठा बॅनरवरून ठरवू नका!
कार्यकर्त्यांच्या निष्ठेबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "अजितदादा आणि सुनेत्राकाकी यांचे आमच्या मनातील स्थान अढळ आहे. केवळ बॅनरवर फोटो नाही म्हणून कोणाची निष्ठा ठरवू नये. बॅनरवर फोटो असणे किंवा नसणे ही तांत्रिक चूक असू शकते, पण पक्षाप्रती असलेली आमची बांधिलकी कायम आहे."
advertisement
टीकाकारांना सडेतोड उत्तर
या वादाला हवा देणाऱ्या यंत्रणेवर निशाणा साधताना अदिती तटकरे यांनी टोला लगावला. त्या म्हणाल्या, "या निमित्ताने एक गोष्ट चांगली झाली की, स्थानिक पातळीवरच्या छोट्या चुकीचा बाऊ करणारी यंत्रणा कशी काम करते, हे आमच्या लक्षात आले. जे लोक आज हा मुद्दा चवीने चघळत आहेत, त्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल किती पश्चाताप होत असेल, हे देवच जाणे!" तसेच, सुनेत्रा पवार यांना आमचे कान पकडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
