भारतीय जनता पक्षाने 1400 जागांसह निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 397 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अनेक ठिकाणी स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला 324 जागा मिळाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं 160 जागांसह आपली ताकद दाखवून दिली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 36 जागांवर समाधान मानावे लागले. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या 153 जागा मिळाल्या आहेत. यात सर्वाधिक लक्षवेधी औवेसींच्या एमआयएमची कामगिरी झाली, त्यांना तब्बल 125 जागांवर मुसंडी मारली. तर राज ठाकरेंच्या मनसेला केवळ 13 जागाच मिळवता आल्या आहेत.
advertisement
एमआयएमचे 13 महापालिकांमध्ये नगरसेवक विजयी
एमआयएमचे केवळ मुंबईतच नाही तर, राज्यातील तब्बल 13 महापालिकांमध्ये नगरसेवक विजयी झालेयेत. त्यात सर्वाधिक 33 नगरसेवक छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी झाले. त्या खालोखाल मालेगावध्ये एमआयएमनं 21 जागा जिंकल्या सोलापूर, धुळे आणि नांदेड या तीन महत्त्वाच्या शहरांत प्रत्येकी 8 जागा जिंकल्या तर मुंबईतही जवळपास 8 जागा जिंकत एमआयएमनं त्यांची कामगिरी सुधारली आहे. अमरावतीत 6, ठाण्यात 5 आणि नागपूरमध्ये एमआयएमचे 4 नगरसेवक विजयी झालेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी, स.पा.ला फटका
महापालिका निवडणुकीत एमआयएमचा सर्वात मोठा फटका काँग्रेससह समाजवादी पक्ष आणि दोन्ही राष्ट्रवादीला बसला आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघातही यंदा एमआयएमचा शिरकाव झाला आहे. त्यामुळंच आता आव्हाडांना त्यांच्याच मतदारसंघातून एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून आव्हान मिळताना दिसत आहे.
मुस्लीम मतदारांनी अनेक राजकीय पक्षांचं गणित बिघडवलं
मुस्लीम मतदारांनी अनेक राजकीय पक्षांचं गणित बिघडवल्याचं पाहायला मिळालं. मुब्र्यात राष्ट्रवादीप्रमाणेच गोवंडी परिसरात यंदा मुस्लीम मतदारांनी समाजवादी पक्षाला नाकारून एमआयएमला पसंती दिली. या निकालातून मुस्लीम मतदारांना आता इतर पक्षांपेक्षा एमआयएम हाच आपला राजकीय पर्याय वाटू लागलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एमआयएमच्या नगरसेवकांची संख्या वाढली
एकंदरीतच, ज्यापद्धतीनं महापालिकेच्या निकालात एमआयएमच्या नगरसेवकांची संख्या वाढलीय. त्यावरुन मुस्लीम मतदारांचा कौल स्पष्ट आहे. त्यामुळं मुस्लिम मतदारांचा हा बदललेला ट्रेंड काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांसह सत्ताधारी महायुतीलाही विचार करायला लावणार आहे.
