जालना जिल्ह्यातील कुक्कुडगाव येथील 15 वर्षीय पूजा कृष्णा राठोड या तरुणीला तब्बल सात वेळा सर्पदंश झाला. तोही विषारी सापाचा! नशीब बलवत्तर म्हणून सात वेळा सर्पदंश होऊनही पूजा आपल्यात जिवंत आहे. परंतु, सध्या ती मानसिक दृष्ट्या सर्वपरीने खचून गेलीय. कधीही काळ आपल्याला गाठू शकतो ही भावना तिच्या मनात प्रबळ झालीये.
advertisement
पूजाच्या आईवडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांच्याकडे केवळ एक एकर शेतजमीन आहे. आई वडील दोघेही शेतमजूर असून गावात वारंवार सर्पदंश होत असल्याने तिला मामाच्या गावी पाठवले. तिथेही दोन वेळा सापाने चावा घेतला. वारंवार होणारे आघात, दवाखान्यात होणारा खर्च यामुळे राठोड कुटुंबावर पाच लाख रुपये कर्ज झालंय. गावातील नागरिकांनी वर्गणी जमा करून पूजाला मदत देखील केली. पण सततच्या खर्चाने राठोड कुटुंब पुरतं हतबल झालंय.
“आम्ही दोघे मजुरी करतो. केवळ एकर शेती असून आमचं दोन खोल्यांचं घर आहे. उपचार करण्यासाठी आतापर्यंत पाच लाखाचं कर्ज काढलंय. ते फेडायचं कसं? याचीच चिंता आहे,” असा सवाल कृष्णा राठोड उपस्थित करतात.
दरम्यान, सातत्याने एकाच व्यक्तीला वारंवार होणाऱ्या सर्पदंशाचे हे वेगळेच प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे. हा नक्की काय प्रकार आहे? याबाबत लोक तर्कवितर्क लढवत आहेत. परंतु, कोणालाही काहीही ठोस उत्तर मिळालेलं नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे आम्हाला नक्की कळवा.





