राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटातच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. काही नेते या निर्णयास पाठिंबा देत असले तरी, काही वरिष्ठ नेते त्यास ठाम विरोध करत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
प्रफुल पटेल, सुनील तटकरेंचा विरोध...
advertisement
विशेष म्हणजे, विलीनीकरणाला विरोध करणाऱ्यांमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सध्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे तसेच प्रफुल पटेल यांची नावे आघाडीवर आहेत. प्रफुल पटेल यांच्याबाबत सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात त्यांचा समावेश होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विलीनीकरणाचा निर्णय घेतल्यास त्यांचा संभाव्य केंद्रीय मंत्री म्हणून पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जयंत पाटलांना संधी? सुनील तटकरेंचे पद धोक्यात?
दुसऱ्या बाजूला, अजित पवार गटातीलच एक गट जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या विरोधात असल्याचे समजते. मात्र जर विलीनीकरणाच्या प्रक्रियेस गती दिली गेली, तर जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावे, असा एक विचारप्रवाहही पक्षात सक्रिय आहे. जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यास, पर्याय म्हणून त्यांना दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रित प्रदेशाध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदाला धोका निर्माण होऊ शकतो.
या साऱ्या घडामोडींमध्ये अजित पवार यांच्याच पक्षात विलीनीकरणाच्या निर्णयाला एक गटाचा स्पष्ट पाठिंबा आहे. तर, तटकरे आणि पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा विरोध असल्याने, तूर्तास विलीनीकरणाची प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता असल्याचे बोलले जात आहे.