पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक फैरी झडताहेत. ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच्याच सोबत मी सत्तेत बसलोय, असे सांगत अजित पवार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. तसेच भाजपच्या सत्ता काळात दोन्ही महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या आरोपांची धार पाहून भाजप नेतेही चांगलेच खवळले आहेत.
advertisement
जरा जपून, CM आणि गृहमंत्री आमचा, चंद्रकांत पाटलांचा इशारा
घरला जायचं आहे का? असे म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की दमात घेऊ नका, हलक्यात पण घेऊ नका, कारण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचा आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. विकासावर निवडणूक न्यायची आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगतलेले असताना मित्रपक्षांमधील टीका किती दिवस चालणार, कुठे थांबणार आहे याचा अंदाज घेऊन ठरवू, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटलांच्या टीकेला अजितदादांचे एका वाक्यात उत्तर
दुसरीकडे अजित पवार यांना पाटील यांच्या टीकेवर विचारले असता त्यांनी अनुल्लेखाने मारणे पसंत केले. कुणी काय बोलायचे याचा अधिकार आपल्याला घटनेने दिलाय. पण त्यांच्या बोलण्याची मी गांभीर्याने नोंद घेतोय, असे हसत हसत अजित पवार म्हणाले.
