यावरून भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील टीका केली. महापालिका निवडणुकीत काही पक्षांनी थेट गुन्हेगारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली आहे, असं म्हणत मोहोळांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. पण आता अजित पवारांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर पलटवार केला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळला परदेशात पळवून कुणी लावलं? असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे. मुरलीधर मोहोळ यांनीच घायवळला पळून लावल्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. यामुळे आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार कुणाचंही नाव न घेता म्हणाले की, एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? त्याला पासपोर्ट कोणी दिला? तो कसा पळाला? त्यांनीसुद्धा गेल्या काही वर्षात कोणाकोणाला कशी उमेदवारी दिली, याची पण माहिती काढा, असे म्हणत अजित पवार यांनी मुरलीधर मोहोळ यांनीच निलेश घायवळला विदेशात जायला मदत केल्याचे संकेत दिले. तसेच, मी पुण्यात गेल्यावर भाजपची आणि माझी यादी दाखवतो. कोणाचे उमेदवार कसे आहेत हे पाहा, मग सगळं स्पष्ट होईल, असंही अजित पवार म्हणाले.
तसेच विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुत्रावरही गुन्हे दाखल आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावरूनही, अजित पवारांनी भूमिका मांडली. गुन्हे दाखल आहेत, पण त्यात तो दोषी ठरलाय का? आता माझ्यावर 70 हजार कोटींचे आरोप झाले, ज्यांनी आरोप केले त्यांच्या सोबत मी बसलोय ना? याचा अर्थ आरोप म्हणजे दोषी नाही, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्र्यांनी दिलं.
मुरलीधर मोहोळांनी काय आरोप केला होता?
मुरलीधर मोहोळ म्हणाले होते की, पालकमंत्री म्हणतात, शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे. मात्र, त्यांची उमेदवारी यादी पाहिली तर ती कोणत्या तत्त्वात हे बसते, त्यांनीच सांगावे. गुन्हेगारांना राजकारणात स्थान नसावे. दुसऱ्या पक्षाने गुन्हेगारांना उमेदवारी दिली. परंतु आम्ही दिली नाही. पुणेकर पाहत आहेत की, नेमकी कोणाला उमेदवारी दिली गेली आहे. मतपेटीमधून त्याचे उत्तर मतदार देतील, असे म्हणत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अप्रत्यक्षरीत्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाना साधला होता.
