अजित पवार यांचे पार्थिव काल बुधवारपासूनच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, तेव्हापासूनच लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. आज सकाळी अजितदादांचे पार्थिव काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे समर्थक आपल्या नेत्याची शेवटची झलक पाहण्यासाठी पोहोचले होते. तर, दुसरीकडे देशपातळीपासून ते राज्यातील महत्त्वाच्या नेते मंडळीदेखील बारामतीमध्ये दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, रामदास आठवले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यासह अनेक नेते बारामतीमध्ये दाखल झाले होते.
advertisement
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या वाहनातून अजितदादांची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिक हात जोडून उभे होते. तर, विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात लाखोंचा जनसागर लोटला होता.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज्य पोलीस दलाच्या वतीने अजित पवार यांना हवेत गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मंत्रोच्चारांच्या घोषात त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी "अजितदादा अमर रहे", 'अजितदादा परत या..', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे पर्व संपले असून, बारामती आज खऱ्या अर्थाने पोरकी झाली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
