उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे धाराशिव येथील नळदुर्गमध्ये शनिवारी प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. अजित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली. जिल्हा परिषद निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच ही शंका व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अजित पवार म्हणाले, “जिल्हा परिषद निवडणुकीसंबंधी या मंगळवारी कोर्टात एक सुनावणी आहे. माझ्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ही निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांवर पुन्हा अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत.
advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका विविध कायदेशीर प्रक्रियेमुळे स्थगित अवस्थेत होत्या. अलीकडेच निवडणूक प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र असतानाच अजित पवारांच्या वक्तव्यामुळे संभाव्य उमेदवारांची चिंता वाढली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहण्याच्या तयारीत असलेल्या राजकीय इच्छुकांची स्वप्ने पुन्हा काही काळासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंगळवारी होणारी कोर्टातील सुनावणी आता निर्णायक ठरणार आहे. या सुनावणीनंतरच जिल्हा परिषद निवडणुकांचा पुढील मार्ग स्पष्ट होणार आहे.
सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी का?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ही ५० टक्केहून अधिक झाल्याचा दावा करत याचिका दाखल करण्यात आली आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेत आगामी निवडणुका पुढे ढकलण्याचे संकेत दिले. सुप्रीम कोर्टाने कोणत्याही परिस्थितीत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलंडता कामा नये असे म्हटले. आता, या प्रकरणाची मंगळवारी सुनावणी होणार आहे.
