राज ठाकरे बारामतीत; पवार कुटुंबियांचे केले सांत्वन
काही वेळापूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये पोहोचले. यावेळी एक अत्यंत भावूक क्षण पाहायला मिळाला. राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अजित पवार हे शरद पवारांचे खंदे समर्थक आणि कुटुंबाचा आधारस्तंभ होते, त्यांच्या अशा जाण्याने शरद पवारांवर मोठा आघात झाला आहे.
advertisement
भेटीदरम्यान, एवढ्या मोठ्या दुःखात असतानाही शरद पवारांनी राज ठाकरेंना बसण्याची विनंती केली, तर राज ठाकरेंनीही अत्यंत आदराने शरद पवारांना बसण्यास सांगत धीर दिला. यावेळी दोन्ही नेत्यांच्या देहबोलीत दु:खाच्या आघाताचे प्रतिबिंब दिसून आले.
प्रचारासाठी निघाले अन् काळाने घात केला
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बुधवारी बारामतीला येणार होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना विमानाचा भीषण अपघात झाला आणि मोठ्या स्फोटात अजितदादांसह सहा जणांनी आपले प्राण गमावले. या घटनेने केवळ राजकीय क्षेत्रच नव्हे, तर सर्वसामान्य जनताही सुन्न झाली आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
अजित पवार यांच्या पार्थिवावर आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, सर्वपक्षीय नेते, मंत्री आणि कार्यकर्ते लाडक्या 'दादां'ना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचत आहेत. बारामतीमधील बाजारपेठा आणि व्यवहार कडकडीत बंद असून, प्रत्येक बारामतीकराच्या डोळ्यात आज अश्रू आहेत.
