बीड: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी नेत्यांचा प्रचार सभांचा धडाका सुरू झाला आहे. प्रचार सभेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. आपल्या रोखठोक, स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. अजितदादांनी बोलण्याच्या ओघात विरोधी उमेदवाराचा प्रचार केला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
नेमकं काय झालं?
बीड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत एक अनपेक्षित प्रसंग घडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणादरम्यान “राम कृष्ण हरी” असा जयघोष केल्याने सभेत काही क्षण वेगळीच रंगत आली. मैदानात उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यावर “वाजवा तुतारी!” असा प्रतिसाद देत घोषणेला दाद दिली.
मात्र, या विधानाचा अर्थ राजकीयदृष्ट्या वेगळा घेतला जाईल, असे लक्षात येताच मंचावरील आयोजकांपैकी एकाने पवारांना चिठ्ठीद्वारे सूचना दिली. या शब्दांचा दुसऱ्या पक्षाशी संबंध असल्याचा गैरसमज निर्माण होऊ शकतो, असे त्यात नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्थानिक पदाधिकाऱ्याने चिठ्ठी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरित ‘सारवा सारव’ करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांनी म्हटले की, “आपण संतांच्या भूमीत आहोत. महाराष्ट्रात एकमेकांना भेटलो की ‘राम कृष्ण हरी’ म्हणतो. कृपया याचा वेगळा अर्थ लावू नका. शंका असेल तर मनातील विचार दूर करून घ्या, असेही त्यांनी म्हटले.
अजित पवारांनी आपले स्पष्टीकरण दिल्यानंतर सभेतील वातावरण पुन्हा निवडणूक प्रचाराकडे वळले, तरीही त्यांच्या 'रामकृष्ण हरी..' या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. अजितदादांनी म्हटलेले रामकृष्ण हरी आणि त्यानंतर केलेली विनंती यामुळे सभा नेमकी कोणाच्या प्रचारासाठी होती असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
