राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असे दोन्ही बाजूच्या काही नेत्यांनी म्हटले होते. त्यानंतर, राष्ट्रवादी युती, एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. तर, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत आघाडी नको, अशी सूचना केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता मोठी घडामोड झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगर परिषदेत अनपेक्षित पण महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. कुटुंबातील राजकीय विभाजनानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येत आघाडी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी चंदगडमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
या आघाडीची मध्यस्थी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. गडहिंग्लज येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत शरद पवार गटाच्या नंदाताई बाभुळकर आणि अजित पवार गटाचे राजेश पाटील यांच्यात चर्चा झाली. अखेर दोन्ही राष्ट्रवादी गटांनी भाजपच्या विरोधात एकत्र लढण्याचा निर्णय घेत “शहर विकास आघाडी” जाहीर केली.
बैठकीनंतर पक्ष सूत्रांनी सांगितले की, स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि भाजपला थोपवण्याच्या उद्देशाने ही आघाडी करण्यात आली आहे. नंदाताई बाभुळकर आणि राजेश पाटील हे दोन्ही गटांकडून प्रमुख चेहरे म्हणून निवडले गेले आहेत.
चंदगड नगर परिषद निवडणूक आता अधिक रंगतदार होणार असून, या आघाडीनंतर भाजपसमोर कठीण समीकरण उभे राहिले आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे एकत्र रणांगणात उतरने म्हणजे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचे संकेत मानले जात आहेत.
