महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निवडणूक प्रचारातील फोटोंवरून बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद उफाळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस बिहारमध्ये १६ विधानसभा जागांवर निवडणूक लढवत आहे. सोनपूर मतदारसंघातील उमेदवार धर्मवीर महतो, हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रचार साहित्यात छगन भुजबळांचा फोटो प्रकाशित केला होता. मात्र, पक्षाचे केंद्रीय पर्यवेक्षक राजकुमार यादव यांनी आदेश देत भुजबळ यांचा फोटो कोणत्याही प्रचार साहित्यावर न वापरण्याचे आदेश दिले.
advertisement
भुजबळांच्या फोटोला नकार, उमेदवार संतापला...
पक्षाच्या नेत्याने दिलेल्या या आदेशामुळे महतो यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी केवळ निवडणूक लढण्यास नकारच दिला नाही, तर पक्षातील सर्व पदांवरून राजीनामा दिला. हा मुद्दा थेट दिल्लीतील पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचताच नेतृत्व अॅक्शन मोडवर झाले. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे चांगले काम आहे. बिहारमध्ये ओबीसींची संख्या प्रभावी आहे. मागील अनेक वर्षांपासून छगन भुजबळ हे बिहारमध्ये चांगलेच सक्रिय आहेत. या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे त्यांच्या फोटोचा वापर न करण्याच्या आदेशाने उमेदवाराने संताप व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे नेतृत्व अॅक्शन मोडमध्ये...
राष्ट्रीय सचिव आणि बिहार प्रभारी सज्जिदानंद सिंह यांनी त्वरीत हस्तक्षेप करत पर्यवेक्षक राजकुमार यादव यांची नियुक्ती रद्द केली. त्यानंतर धर्मवीर महतो यांची नाराजी दूर करण्यात आली आणि त्यांनी पुन्हा उमेदवारी स्वीकारली. या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या बिहारमधील संघटनात्मक समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांविषयी स्थानिक स्तरावर मतभेद उफाळल्याचे चित्र दिसत आहे.
