मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजप आणि शिंदे गटामधील जागावाटपावरून अंतर्गत धुसफूस वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. जागा वाटपाच्या चर्चेत भाजपकडून कोंडी होत असल्याने शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे सन्मानजनक जागा अथवा स्वबळावर लढण्याचा आग्रह केला आहे. एकनाथ शिंदे यांनी संयमी भूमिका घेतली आहे. मात्र, दुसरीकडे नवाब मलिकांच्या नेतृत्वाला विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता अजित पवार गटाशी थेट संवाद सुरू केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेत जागांचा प्रस्ताव दिला आहे.
advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकूण २२७ पैकी किमान १५० जागा लढवण्यावर भाजप ठाम असल्याचे सांगितले जाते. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या ८२ जागा तसेच सध्या शिंदे गटात नसलेल्या नगरसेवकांच्या जागांवरही भाजपकडून दावा केला जात आहे. मात्र, या भूमिकेला शिंदे गटाकडून विरोध होत असल्याने भाजपने पर्यायी डावपेच म्हणून मुंबईत अजित पवार गटाशी वाटाघाटी सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपसमोर ५० जागांचा प्रस्ताव दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी रात्री सुनील तटकरे यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याचेही सांगण्यात येत असून, आगामी काळात महायुतीतील समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिंदेंची कोंडी, अजितदादांचा फायदा?
राष्ट्रवादीच्या एन्ट्रीनंतर शिंदे गटाची अस्वस्था वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजप आणि शिंदे गटाने १५० जागांवर एकमत झाल्याचा दावा केला आहे. या १५० जागांमध्ये शिंदे गटाला ५२ जागा सोडण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मागील निवडणुकीत ठाकरेंच्या विजयी जागा शिंदे गटाला सोडण्यास भाजपने नकार दिला आहे. त्यामुळे कोंडी वाढली आहे. तर, दुसरीकडे अजित पवारांकडून ५० जागांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामध्ये एकसंध राष्ट्रवादीने जिंकलेल्या जागांसह अल्पसंख्याकांचा प्रभाव असणाऱ्या जागांचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. घाटकोपर, भांडुप, मानखुर्द, अणुशक्तीनगर, वांद्रे, आदी विभागांमध्ये राष्ट्रवादी आपला दावा सांगण्याची शक्यता आहे.
भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुस्लिम विभागातील जागा सोडण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. त्याशिवाय, आतापर्यंत युतीने कधीही न जिंकलेल्या जागाही शिंदे गटासाठी सोडण्यात येणार होत्या. मात्र, शिंदे गटाकडून या प्रस्तावाबाबत फारशी अनुकूलता दाखवण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता, राष्ट्रवादीच्या एन्ट्रीनंतर जागा वाटपाची सगळी समीकरणे बदलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
इतर संबंधित बातमी:
'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी
