विधानसभा निवडणुकीत दादांची सरशी...
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि काका शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसह महायुतीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा राजकीय संघर्ष सुरू झाला. या संघर्षातील पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना शरद पवारांनी जोरदार धोबीपछाड दिला. तर, दुसरा राजकीय संघर्ष हा विधानसभेत दिसून आला. यामध्ये अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सव्याज परतफेड केली. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे फक्त 10 उमेदवार विजयी झाले.
advertisement
अजित पवार गटाच्या नेत्याचा दावा काय?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचे ट्वीट चर्चेत आले आहे. रोहित पवारांना टोला लगावताना अमोल मिटकरी यांनी म्हटले की, तो लोकशाही वाचवायला चालला आहे. पण, तुतारीचे वर्धा ते भिवंडी खासदार व सहा आमदार वाचव! देवगिरी व सागर बंगल्या बाहेर चकरा सुरू असल्याचे मिटकरी यांनी म्हटले. मिटकरी यांच्या ट्वीटने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
खासदार सुरेश म्हात्रेंनी घेतली फडणवीसांची भेट
भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी सोमवारी दुपारी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, सुरेश म्हात्रे यांनी ही भेट वैयक्तिक कामासाठी होती असे म्हणत आपण शरद पवारांसोबत आहोत, असे स्पष्ट केले.
