नेमकं प्रकरण काय?
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरात नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, या मेळाव्यासाठी शहरात लावण्यात आलेल्या अधिकृत बॅनरवर एक विचित्र गोष्ट सर्वांच्या निदर्शनास आली. या बॅनरवर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि स्थानिक नेत्यांचे फोटो डोकवत असताना, पक्षाचा मुख्य चेहरा राहिलेल्या दिवंगत अजित पवार यांचा फोटो मात्र पूर्णपणे गायब होता. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा स्थानिक नेत्यांसोबत लहान फोटो बॅनरवर दिसला. रायगडमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो हटवल्यामुळे आधीच टीका झाली होती. आता तोच 'रायगड पॅटर्न' प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यातही पाहायला मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
या प्रकरणावर पत्रकारांनी जेव्हा प्रफुल्ल पटेल यांना छेडले. त्यावर पटेलांनी उत्तर देणं टाळले. प्रफुल पटेल यांनी, "आता राहू द्या सगळं हे..." असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. प्रफुल पटेल यांच्या वक्तव्याने मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ज्या नेत्याच्या नावावर आणि कर्तृत्वावर हा गट उभा राहिला, त्यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना बॅनरवरून गायब करणे हा कृतघ्नपणा असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुरू झाली आहे.
