छत्रपती संभाजीनगर, 2 डिसेंबर : मराठा आरक्षण आंदोलनामुळे सर्वच राजकारण्यांची गोची झाली आहे. मराठा समाजाच्या रोषाला सर्व पक्षीय नेत्यांना सामोरे जावे लागत आहे. आज गंगापूरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियोजित दौरा रद्द करावा लागला. अजित पवार यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला होता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा होता. अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. चौका चौकात पोलीस उभे होते..याला कारणही तसेच होते. अजित पवारांच्या दौऱ्याला मराठा समाजानं विरोध केला होता. मराठवाडा साहित्य संमेलनाचं उदघाटन अजित पवारांच्या हस्ते होणार होतं आणि त्याला मराठा समाजानं विरोध केला होता. दरम्यान अजित पवारांचा दौरा रद्द झाला, त्यामुळे आमदार प्रकाश सोळुंखे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आलं.
advertisement
अजित पवारांच्या या दौऱ्यापूर्वी सकल मराठा समाजानं अजित पवारांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यास विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर विरोध करणाऱ्या चार मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. राजकीय नेत्यांऐवजी साहित्यिकांच्या हस्ते संमेलनाचं उदघाटन करावं अशी मागणी मराठा सकल समाजानं केली होती.
दौरा रद्द व्हायचं कारण काय?
पुण्याचं वातावरण ढगाळ होतं. अजित पवार एक तास हेलिकॉप्टर मध्ये बसून होते.. ATC कडून उड्डाणास परवानगी न मिळाल्यानं पवारांचा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. राजकीय नेत्यांनी मराठा आंदोलनाची चंगलीचं धास्ती घेतलीय. अनेक मंत्री आणि नेत्यांना त्याचा फटका बसला आहे. शुक्रवारी कर्जतमधली अजित पवार गटाच्या शिबिराबाहेर मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा गंगापूर दौरा रद्द झाल्यामुळे राजकीय चर्चा रंगल्याचं पाहायला मिळाली.