पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी दौंड दौऱ्यावर आहेत. मात्र दौंडमध्ये असतानाही त्यांचे लक्ष सतत मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनावरच असल्याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. दौंडमधील एका हॉटेलला दिलेल्या भेटीदरम्यान पवार यांनी फोनवरून आंदोलनाच्या गर्दीची विचारपूस केली. “आंदोलनाला किती गाड्या आल्या? आता गाड्या थांबल्या का?” अशी विचारणा करतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या उपोषणाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. ऐन गणेशोत्सवात हे आंदोलन मुंबईच्या मध्यभागी सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. हजारो गाड्या, गावागावातून आलेले कार्यकर्ते आझाद मैदान गाठत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर अजित पवार आंदोलनाच्या हालचालींवर थेट लक्ष ठेवून आहेत, याचा प्रत्यय व्हायरल व्हिडीओमधून आला आहे.
सरकारवर आंदोलनाचा दबाव
सरकारवर आंदोलनाचा दबाव वाढत चालला आहे. मराठा समाज आक्रमक भूमिकेत असून, “सरकार आता किती वेळ टाळाटाळ करणार?” असा सवाल समाजातून केला जात आहे. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अजित पवार हे आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. “गणेशोत्सवात मुंबई ठप्प, सरकारला जाग कधी येणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, “अजितदादा असतील तिथून थेट परिस्थितीवर लक्ष ठेवतात” अशा समर्थकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहे.
मुंबईतील वाहतूक ठप्प
गावागावातून आलेल्या हजारो गाड्यांमुळे मुंबईतील वाहतूक ठप्प झाली आहे. आझाद मैदान परिसरातील रस्त्यांवर मोठी कोंडी निर्माण झाली असून, गणेशोत्सवासाठी आलेल्या भाविकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. लोकल रेल्वेपासून रस्ते वाहतूक व्यवस्थेपर्यंत सर्वत्र ताण जाणवतो आहे.आंदोलनकर्त्यांची गर्दीमुळे, पोलिस आणि प्रशासन यांचेही गणेशोत्सवातील नियोजन विस्कळीत झाले आहे.
मनोज जरांगेंचा इशारा
27 तारखेपासून जालन्यातील अंतरलवाली सराट्यातून निघालेला भव्य मोर्चा आज सकाळी 10 वाजता मुंबईतील आझाद मैदानात दाखल झालं. दरम्यान, उपोषणस्थळी दाखल होताच मनोज जरांगेंनी शिवरायांना अभिवादन करून उपोषणाला सुरुवात केली आहे. सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी यावेळी दिला. मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हटायचं नाही हलायचं नाही, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही असंही जरांगे म्हणालेत. सरकारने गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला.