पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष निवडणुकीच्या मैदानात दिसून आला. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पुन्हा एकदा रंगणार असल्याचे चित्र आहे. बारामतीमध्ये याचे संकेत दिसून आल्याची चर्चा सुरू झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या जागी आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडात पुन्हा एकदा पवार घराण्यातील वर्चस्वाची लढाई चव्हाट्यावर आली असल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या पुनर्रचनेतून मोठा बदल समोर आला आहे. या मंडळावर अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे यांना हटवून राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे बारामतीच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते.
राज्यातील बृहन्मुंबईसह इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांसाठी अभ्यागत मंडळ स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय 30 जानेवारी 2010 रोजी झाला होता. त्यानुसार बारामतीतील या संस्थेसाठी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. नव्या यादीत अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे खासदार सुप्रिया सुळे यांना वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पवार कुटुंबातील अंतर्गत राजकारणाशी याचा संबंध जोडूनही या निर्णयाकडे पाहिले जात आहे. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांच्या निवडीमुळे बारामतीच्या सत्ताकारणात एक नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.