मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी अकोला शहरातील एका नामांकित खासगी शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. त्याच शाळेतील आठव्या वर्गातील एक अल्पवयीन मुलगा तिला गेल्या सहा महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्रास देत होता आणि तिची छेड काढत होता.
पालकांकडून वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष
या त्रासामुळे त्रस्त झालेल्या मुलीने याबाबतची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीच्या आईवडिलांनी तातडीने संबंधित शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधला आणि याबाबत माहिती दिली. तसेच, सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी त्रास देणाऱ्या मुलाच्या वडिलांशी देखील फोनवरून बोलून याबाबतची कल्पना दिली होती. मात्र, मुलाच्या पालकांनी आणि विशेषतः शाळा प्रशासनाने या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष केले आणि मुलाला वेळीच समज दिली नाही. त्यामुळे मुलाकडून त्रास सुरूच राहिला.
advertisement
घरी कुणी नसताना घेतला गळफास
रविवारी घरी कुणीही नसताना, या सततच्या छेडछाडीला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचलले. तिने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आईवडील घरी परतल्यानंतर मुलीला आवाज दिला असता, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. पालकांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी त्वरित कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. तसेच, मुलावर नियंत्रण न ठेवल्याबद्दल त्याच्या वडिलांना देखील अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर मृत मुलीच्या वडिलांनी अत्यंत भावनिक आवाहन केले आहे. "माझी मुलगी जीवाने गेली, पण शहरात यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी शाळा प्रशासन व पोलिसांनीसुद्धा लक्ष घालावे. मुलींना होणाऱ्या त्रासापासून वाचवावे," अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.
