सूरज (नाव बदललं आहे) असं या नवरदेवाचं नाव असून प्रीती शिवाजी राऊत असं अटक केलेल्या नवरीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर प्रल्हाद गुळभिले नावाच्या एजंटने 1 डिसेंबरला सूरजला फोन केला होता. लग्नासाठी मुलगी असल्याची माहिती दिली होती. दुसऱ्याच दिवशी एजंटने सूरजकडून १० हजारांची मागणी केली. यानंतर लॉजमध्ये राहण्यासाठी आणि लग्नाच्या खरेदीच्या नावाखाली आरोपींनी सूरजकडून १ लाख ९० हजार रुपये घेतले. ६ डिसेंबरला लग्नाची तारीख धरली.
advertisement
६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता दिपे वडगाव येथील हनुमान मंदिरात सूरज आणि प्रीतीचं लग्न लावून दिलं. त्यानंतर नवरीला घेऊन वऱ्हाड कोदरी येथे परतलं. घरात नवीन सून आली म्हणून घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र हा आनंद अवघे तीन तास टिकला. कारण सायंकाळी ४ वाजता प्रीतीने शौचाला जाण्याचा बहाणा केला आणि घरातून पळ काढला. तिला पळताना गावातील एका व्यक्तीने पाहिले आणि आरडाओरड केली.
नातेवाईकांनी पाठलाग करून तिला पकडलं. यावेळी तिने पोलिसांना फोन करून आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर तिचं बिंग फुटलं. प्रीतीने तिची मावशी सविता (रा. पुणे), माया सतीश राऊत (रा. चाकण) आणि एजंट प्रल्हाद गुळभिले यांनी संगनमत करून ही फसवणूक केल्याचं कबूल केलं.
फसवणूक करण्यासाठी या टोळीने पूर्णपणे प्लॅन आखला होता. लग्नाआधीच प्रीती राऊत हिचं नाव बदलून पतीच्या नावासह बनावट आधार कार्ड तयार केलं होतं. मात्र नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे ही टोळी पोलिसांच्या कचाट्यात सापडली आहे. या टोळी राज्यात इतरही तरुणांना अशाप्रकारे गंडा घातला आहे का? याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
