मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगेंच्या नेतृत्वात आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू झाले आहे. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. आजपासून जरांगे हे निर्जळी उपोषण करणार आहेत. याचाच अर्थ आजपासून जरांगे उपोषणात पाणीदेखील घेणार नाहीत. मनोज जरांगे यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना आदेश दिले आहेत.
advertisement
मागील 3 दिवसांत मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. आज, मुंबईत मराठा आंदोलकांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. मुंबई महापालिका आणि सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी उसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रविवारी, मनोज जरांगे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना कुचक्या कानाचा आणि मानासाठी भूकेला असल्याची टीका केली होती. राज ठाकरे यांचा पक्ष फडणवीसांनी संपवला, मुलाला निवडणुकीत पाडलं असलं तरी त्यांना फडणवीस चहा प्यायला येतात, याचं कौतुक वाटतं असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले होते.
राज ठाकरे यांना मराठा आंदोलनावर विचारलेल्या प्रश्नावर जरांगे हे मुंबईत का आले, याचे उत्तर एकनाथ शिंदे देतील असे म्हटले. शिंदे यांनी जरांगेंना वाशीत काय आश्वासन दिले होते आणि आता परत ते का आले, हे शिंदेच सांगू शकतील असे उत्तर दिले होते. त्यावर मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
अमित ठाकरेंनी काय आदेश दिले?
राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन मनसैनिकांना केले आहे. अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवा, असं आवाहन केलं आहे. त्यांच्या राहण्याची, सुरक्षितेची काळजी घेण्याचे आवाहनही अमित ठाकरे यांनी केले आहे.
अमित ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,
सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत. ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे,
- जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा.
- औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका.
- त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
- एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे.
लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले.