दर्यापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यंदा चुरस शिगेला पोहोचली आहे. यंदा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन जावांमध्ये थेट सामना होणार आहे. भाजपाच्या आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांत विधानसभा पातळीवर प्रभाव असलेल्या भारसाकडे कुटुंबासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
मात्र या निवडणुकीचं खरं लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे, नलिनी भारसाकडे यांच्या विरोधात त्यांच्या जाऊ मंदा भारसाकडे काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणातच नव्हे तर कुटुंबातील तणावही चव्हाट्यावर आला आहे. दोन जावा, दोन भिन्न पक्ष आणि एकाच पदाची निवडणूक यामुळे दर्यापूरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे.
advertisement
नलिनी भारसाकडे यांनी याबाबत बोलताना स्पष्टपणे भावनिक प्रतिक्रिया दिली. “दहा वर्षे ज्यांचा मी पालनपोषण केलं, त्याच दीराने स्वतःच्या पत्नीला माझ्या विरोधात उभं केलं… हेच मला सर्वात जास्त वाईट वाटतं,” असं त्या म्हणाल्या. त्यांच्या वक्तव्याने निवडणूक वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुटुंबातील नातेसंबंध ताणले असल्याचे या प्रतिक्रियेतून स्पष्ट दिसत आहे.
गेल्या निवडणुकीतही कुटुंबीयांमध्येच सामना रंगला होता. तेव्हा नलिनी भारसाकडे यांच्या विरोधात त्यांचेच दीर सुधाकर भारसाकडे उभे होते. त्या वेळी मात्र नलिनी भारसाकडे विजयी झाल्या होत्या आणि नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. यावेळी दीराऐवजी जाऊ समोर आल्याने संघर्ष आणखी कठीण होणार आहे.
