चुरणी गावातील एका कुटुंबाने संगनमताने 11 सदस्यांच्या नावाने गोठा, घरकुल, विहीर, बांबू लागवड, फळबाग अशा अनेक योजनांचे लाभ घेतले. प्रत्यक्ष काम न करता फक्त कागदोपत्री अंमलबजावणी झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे मेळघाटातील प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल होताच प्रशासन हलले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
advertisement
एकाच घरातील 11 जणांचा योजनांवर हक्क
रघुनाथ अमृतलाल टाले या व्यक्तीच्या कुटुंबाने पत्नी, मुले, सुना, अविवाहित मुली आणि मृत भावाच्या कुटुंबासह एकूण 11 जणांच्या नावाने योजना घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये शेळीपालन शेड, गाईचा गोठा, घरकुल, बांबू लागवड, फळबाग आणि सिंचन विहीर अशा सर्वच प्रकारच्या योजनांचा समावेश आहे. आश्चर्य म्हणजे, या सर्व योजना एकाच जागेवर दाखवून कागदोपत्रीच पूर्ण करण्यात आल्या असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
नोकरदार मुलीच्याही नावावर घेतला योजनेचा लाभ
नियमांनुसार शासकीय अथवा खासगी नोकरी करणाऱ्या व्यक्तीस रोजगार हमी योजनेचा लाभ मिळत नाही. मात्र टाले कुटुंबातील दिव्यानी रघुनाथ टाले या खासगी बँकेत कार्यरत असतानाही त्यांच्या नावावर योजना मंजूर करण्यात आली. योजनेच्या कामासाठी त्यांचे नाव मस्टरवर दाखवण्यात आले असल्याने, एकच व्यक्ती एकाच वेळी दोन ठिकाणी काम कसे करू शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तक्रार आणि प्रशासनाची भूमिका
या संपूर्ण प्रकाराची तक्रार दिनेश लिंबा ब्राह्मणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली असून सर्व कागदपत्रांसह पुरावे सादर करण्यात आले आहेत. या संदर्भात गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी सांगितले की, प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. चौकशीसाठी आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
या घटनेनंतर चुरणी गावात संतापाचे वातावरण आहे. स्थानिक ग्रामस्थांनी कायम गरीब शेतकऱ्यांना योजना मिळत नाहीत, मात्र काही प्रभावी कुटुंबांनी संगनमताने निधी लाटला, असा आरोप केला आहे. या प्रकाराने रोजगार हमी योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेचा गंभीर अभाव असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
