अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीला जयंती सर्वत्र साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो. महाराजांवर आमचे अफाट प्रेम आणि श्रद्धा आहे, असे म्हणणारे शिवभक्त तर अनेक आहेत. पण, दिवाळीच्या दिवशी महाराज रायगडावर एकटे असतात. ज्यांनी सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाश पाडला. तोच माझा राजा दिवाळीच्या दिवशी अंधारात आहे. हे बघून अगदी रायगडावर महाराजांसोबत दिवाळी साजरी करण्याचा विचार करेल असा शिवभक्त असेल तर आश्चर्यच ना. दिवाळीच्या दिवशी आपल्या कुटुंबाला घेऊन रायगडावर राहणारा शिवभक्त अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमधील शिवअभ्यासक व्याख्याते प्रा. गजानन देशमुख हे गेल्या 14 वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत रायगडावर दिवाळी साजरी करतात.
advertisement
अमरावती मधील प्रा. गजानन देशमुख यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, मला गडकिल्ले फिरण्याची आणि अभ्यासण्याची आवड आहे. त्यामुळं मी गडकिल्ले फिरत होतो. येथून 14 वर्षाआधी दिवाळीच्या दिवशी रायगडावर राहण्याची योग आला. आजूबाजूचे सर्व किल्ले फिरून झाले आणि मी रायगडावर जाण्याचा विचार केला. मला वाटलं होतं की दिवाळी आहे तर रायगडावर नक्कीच मोठा उत्सव असेल.
Shiv Jayanti: असाही शिवप्रेमी! अवघ्या 9 वर्षांचा चिमुकला, कामगिरी पाहाल तर आवाक व्हाल!
तिथे गेल्यानंतर काही लोकं होती त्यानंतर हळूहळू सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. मी गडावर एकटाच होतो, सर्वात आधी मी महाराजांच्या राज सिंहासनाजवळ गेलो तिथेही काळोख होता. त्यानंतर महाराजांच्या समाधी जवळ गेलो तिथेही काळोखच होता. रायगडावरील प्रत्येक कोपऱ्यात मला काळोखच दिसत होता. समाधी जवळ असताना मला खूप वाईट वाटलं. रयतेच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारा माझा राजा आज दिवाळीच्या दिवशी अंधारात आहे. हे बघून मी खूप विचार केला आणि ठरवलं की येथून पुढे आपण रायगडावर येवून दिवाळी साजरी करायची.
घरी गेल्यानंतर ही गोष्ट मी माझ्या पत्नीला सांगितली. ती सुद्धा यासाठी तयार झाली. तेव्हापासून म्हणजे 2010 पासून मी आणि माझे कुटुंब रायगडावर दिवाळी साजरी करतो. महाराजांच्या समाधीजवळ पणत्या लावतो. राजसिंहासनाजवळ, शिरकाई देवीजवळ पणत्या लावून आमची दिवाळी पूर्ण होते. ज्यावेळी सर्वजण आपापल्या घरी लक्ष्मीपूजन करत असतात तेव्हा आम्ही महाराजांसोबत असतो. ही महाराजांसाठी असलेली श्रद्धा आहे प्रेम आहे.
कोरोनाकाळात सुद्धा आमचा क्रम चुकला नाही. तेव्हा सर्वत्र गड बंद करण्यात आले होते. तेव्हा सुद्धा आम्ही पायथ्याशी पणत्या लावायला येथे आलो होतो. तेव्हा अचानक रात्री 3 वाजता मला मॅसेज आला की, रायगड पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. तेव्हा सुद्धा आम्ही दिवाळी गडावर साजरी केली. तेव्हाचा न विसरणारा प्रसंग म्हणजे, आमची राहण्याची व्यवस्था नव्हती. 10 महिने रायगड बंद असल्याने सर्वत्र जंगली प्राण्यांचा शिरकाव होता. अशा परिस्थितीत मी आणि माझे कुटुंब महाराजांच्या राजसिंहासनाच्या खाली उघड्यावर झोपलो. पण, आम्हाला काहीही झालं नाही. एकही प्राणी आमच्या पर्यंत आला नाही. कारण त्याआधी आम्हाला तिथे प्राणी दिसून आले होते. पण, रात्रभर काहीही झालं नाही, ही सर्वात मोठी बाब आहे. पुढेही माझ्याकडुन होईल तोपर्यंत मी हा उपक्रम राबवत राहणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.