अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करण्याची विनंती सरकारकडून करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरातीच्या PDF ची लिंक बातमीमध्ये देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोन पदासांठी नोकरभरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. एकूण 12 पदांसाठी ही नोकरभरती केली जात आहे. अंगणवाडी सेविका पदासाठी 2 रिक्त जागा आहेत. तर, मदतनीस पदासाठी 10 रिक्त जागा आहेत. 24/10/2025 ते 07/11/2025 या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज मागविण्यात येत आहेत.
advertisement
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या तारखेप्रमाणे कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हसावद ता. शहादा यांच्या कार्यालयात उमेदवाराने स्वत: समक्ष अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (सोबत अर्जाचा नमुना जोडला आहे.) उपरोक्त नमूद दिनांक आणि वेळेनंतर या कार्यालयामार्फत कोणतेही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अंगणवाडी मदतनिस पदासाठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
महिला अर्जदार स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे. अर्जदार महिला ही अंगणवाडी केंद्र असलेल्या महसुली गावातील ग्रामपंचायत नव्हे ज्यात महसुली गाव/ वाडी/ वस्ती किंवा पाडे इथले स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे. यासाठी अर्जासोबत स्वयंघोषणा पत्र आणि रहिवासी पुरावा जोडणे बंधनकारक असणार आहे. स्थानिक रहिवासी बाबत पेच किंवा तक्रार प्राप्त झाल्यास सबंधित सक्षम प्राधिकारी यांचा रहिवासी दाखला देणे बंधनकारक राहिल. अंगणवाडी मदतनिस पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे आहे. जर, महिला अर्जदार विधवा असेल तर त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहिल. पतीचे मृत्यु नोंदणी प्रमाणपत्र व विधवा असल्या बाबत विहित नमुन्यात स्वयं घोषणा प्रमाणपत्र दोन्ही जोडणे आवश्यक आहे.
वयाचा पुरवा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म नोंद दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील. उमेदवाराचे किमान आणि कमाल वय हे अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास गणण्यात येईल. लहान कुटुंबाकरिता दि. 27/02/2024 चा शासन निर्णय लागु राहील, नोकर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लहान कुटुंबाची अट लागु राहिल. उमेदवारांस दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये (दत्तक दिलेल्या अपत्यांसह) नसावीत. अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबा बाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहिल.मदतनिस रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराने नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील.
सदर अंगणवाडी केंद्रातील 50% हुन अधिक मुले मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा (शासन निर्णयात नमूद केल्या प्रमाणे) बोलणारे असतील तर त्या भाषेचे ज्ञान (लिहिता व वाचता येणे) उमेदवारास असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती- जमाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागासवर्गसह इतरत्र जातीतील प्रत्येक उमेदवाराला आपले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. एका उमेदवाराने एकाच पदासाठी एकच अर्ज सादर करावा. उमेदवाराने एका पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास प्रथम प्राप्त एकच अर्ज विचारात घेण्यात येईल आणि त्याबाबत उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
नोकर भरतीसाठी उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरुन इयत्ता 12 वी, पदवीधर, पदव्युत्तर, डिएड, बीएड, संगणक परिक्षा, विधवा, अनाथ, अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग, अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव या बाबींच्या आधारे गुण दिले जाणार आहे. उमेदवारास मिळालेल्या एकूण गुणांनुसार गुणानुक्रमाने पात्र उमेदवारांची रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल. या पदांकरीता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही. अर्जा सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांनुसार शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
