असदुद्दीन ओवैसी यांच्या कोल्हापूर दौऱ्याला हिंदुत्त्ववादी नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे ओवैसी कोल्हापुरात येणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र ओवैसी यांची नियोजित सभा कोल्हापुरात पडली. अपेक्षेप्रमाणे त्यांनी आव्हान देणाऱ्या हिंदुत्त्ववाद्यांवर सडकून प्रहार केले.
पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानविरोधात बोललो, तुम्ही माझ्या देशात मला अडवता?
पोलीस बांधवांनो, नवरात्रोत्सवात आम्ही कोल्हापुरात आलो. त्यामुळे आपल्याला बंदोबस्त द्यावा लागला पण ही भूमी राजर्षी शाहू महाराज यांची आहे, ज्यांनी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली. काही नेत्यांनी सांगितलं की ओवेसी आणि जलील यांना पाय ठेवू देणार नाही. पण मी दाखवतो हा माझा पाय आहे आणि आम्ही कोल्हापुरात ठेवला आहे, असे पाय दाखवत ओवैसी म्हणाले.
advertisement
२०१३ साली पाकिस्तानमध्ये गेलो होतो, तिथे जाऊन मी पाकिस्तानविरोधात बोललो, सौदीमध्ये जाऊन पाकिस्तानचा बुरखा फाडला आणि इथे तुम्ही माझ्या देशात मलाच रोखण्याची भाषा करताय, असा सवाल ओवैसी यांनी विचारला.
कोल्हापुरात यायचं नाही तर काय इजिप्तमध्ये जायचं?
आज महाराष्ट्रात महापूर आला आहे, शेतकरी संकटात आहे. दौरे करण्यापेक्षा मंत्र्यांनी मदत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला कोल्हापुरात, इचलकरंजी येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही कोल्हापुरात यायचं नाही तर काय इजिप्तमध्ये जायचं, ही भूमी आमची देखील आहे, असे ओवैसी म्हणाले.
लव्हलेटवरून मिश्किल टिप्पणी
जे वादग्रस्त वक्तव्ये करतायेत त्यांना पोलीस काही बोलत नाही, मला हेट स्पीच करू नका, अशी नोटीस देतायेत. मी दोन वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार आहे. मी घरी जाईल आणि बायकोला कळेल की मला लव्ह लेटर (पोलिसांची नोटीस) मिळाले, त्यालेळी तिला काय वाटेल. मी आत्ता ५६ वर्षांचा आहे, गुपचूप मला आय लव्ह यू म्हणा, अशी मिश्किल टिप्पणी ओवैसी यांनी केली.
पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला नको होते
आशिया कप आला नसता तरी चाललं असतं, पण आपण दहशतवादी पोसणाऱ्या पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला नको होते. आपण काय बघतोय तर आमच्या खेळाडूंनी हात मिळवला नाही.
आय लव्ह मोहम्मद लिहिल्यानंतर इतका गोंधळ उडण्याची गरज काय? मोहम्मद आमच्या हृदयात आहेत, जीव गेला तरी चालेल पण ते हृदयातच राहतील, असे सांगत पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरणार. यावेळी आम्ही अनेकांची वाजवायला आलोय. बिहारमध्ये सुद्धा आम्ही येतोय, असे ओवैसी म्हणाले.