पती-पत्नीने शेतकऱ्यांनी फेकून दिलेल्या कचऱ्यापासून उभारला व्यवसाय, आता करताय 1 कोटींची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : आज देशभरातील शेतकरी आणि उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिथे बहुतांश लोक केळीच्या शेतीनंतर उरलेल्या देठांकडे निरुपयोगी कचरा म्हणून पाहत होते.
मुंबई : आज देशभरातील शेतकरी आणि उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिथे बहुतांश लोक केळीच्या शेतीनंतर उरलेल्या देठांकडे निरुपयोगी कचरा म्हणून पाहत होते. तिथे ओडिशातील खोरधा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून काशीनाथ जेना आणि त्यांची पत्नी अनुसूया जेना यांनी त्याच कचऱ्यातून संधी शोधली. ‘कचऱ्यातून संपत्ती’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत या दाम्पत्याने केवळ यशस्वी व्यवसाय उभारला नाही, तर पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण समृद्धीचा आदर्शही निर्माण केला आहे.
पूर्वी केळीची कापणी झाल्यानंतर शेतात उरलेल्या जाडजूड देठांची विल्हेवाट लावणे हे शेतकऱ्यांसाठी मोठे संकट होते. हे देठ काढण्यासाठी मजुरी द्यावी लागे किंवा ते जाळले जात, ज्यामुळे प्रदूषण वाढत असे. काशीनाथ जेना यांनी गावाला भेट दिली असता ही समस्या त्यांच्या लक्षात आली. सुपीक गाळयुक्त मातीमुळे केळीचे भरघोस उत्पादन होत होते, मात्र कापणीनंतरचा कचरा शेतकऱ्यांच्या डोक्यावरील ओझे बनत होता. याच समस्येने त्यांना विचार करण्यास भाग पाडले आणि त्यांनी या अडचणीला संधीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
नवीन स्टार्टअपची सुरुवात
केळीच्या देठांमधील तंतू, अन्नमूल्य आणि औद्योगिक उपयोग यांचा अभ्यास करण्यासाठी काशीनाथ यांनी विविध राज्यांत प्रवास केला. संशोधन, प्रयोग आणि स्थानिक गरजांचा अभ्यास करून 2021 मध्ये काशीनाथ आणि अनुसूया जेना यांनी ‘जयदेव बनाना फार्मर्स अँड आर्टिसन्स असोसिएशन’ या स्टार्टअपची सुरुवात केली. आज ही संस्था दरमहा सुमारे 300 टन केळीच्या कचऱ्यावर प्रक्रिया करते आणि त्यातून तब्बल 100 हून अधिक उत्पादने तयार केली जातात.
advertisement
या व्यवसायाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणजे त्याचे शून्य कचरा मॉडेल. केळीच्या देठातील आतला मऊ भाग वापरून लोणची, रस, जाम यांसारखी खाद्यपदार्थ तयार केली जातात. बाहेरील थरातून काढलेल्या तंतूंमधून ‘केळीच्या रेशीम’सारख्या चमकदार धाग्यांपासून हस्तनिर्मित पिशव्या, चटया, सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. उरलेला भाग सेंद्रिय खत आणि नैसर्गिक कीटकनाशकांसाठी वापरला जातो. परिणामी, कोणताही कचरा शिल्लक राहत नाही.
advertisement
केळीचा कचरा आता उत्पन्नाचा स्रोत ठरला
या उपक्रमाचा सर्वाधिक फायदा स्थानिक शेतकऱ्यांना झाला आहे. पूर्वी खर्चाचा विषय असलेला केळीचा कचरा आता उत्पन्नाचा स्रोत ठरला आहे. शेतकऱ्यांना प्रति झाड सुमारे 10 रुपये मिळू लागले आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुप्सच्या माध्यमातून कचरा संकलनाची प्रभावी साखळी उभी करण्यात आली असून, संस्थेची वाहने थेट शेतातून देठ गोळा करतात. यामुळे प्रदूषणात घट झाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळाले आहे.
advertisement
1 कोटींची उलाढाल
व्यावसायिक पातळीवरही या स्टार्टअपने मोठी झेप घेतली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात या उपक्रमाची उलाढाल 1 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 2030 पर्यंत 10 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या 1,000 हून अधिक शेतकऱ्यांशी जोडलेला हा उपक्रम लवकरच 3,000 शेतकऱ्यांपर्यंत विस्तारण्याच्या मार्गावर आहे. काशीनाथ आणि अनुसूया जेना यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 7:17 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
पती-पत्नीने शेतकऱ्यांनी फेकून दिलेल्या कचऱ्यापासून उभारला व्यवसाय, आता करताय 1 कोटींची कमाई








